जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून एक्स पोस्ट
ठाणे: महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्रा-कळवा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी तिघांचेही आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याची आव्हाड यांनी पोस्ट टाकली आहे. आव्हाड यांच्या या एक्स पोस्टमुळे नेमके त्यांना काय म्हणायचे आहे याबाबत आता राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.
गेल्या तीन टर्मपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार यांनी देखिल जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याचा पठ्या असा उल्लेख करत त्यांच्याचार टीका केली होती. त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती.
कळवा-मुंब्रा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदार संघात येत असून या मतदार संघाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे करतात. त्यामुळे नजीब मुल्ला यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात आणि विशेष करून कळवा नाका या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती. आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याची रणनीती आखली होती. आता आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच स्थानिक खासदार यांना उद्देशून अशाप्रकारे एक्स पोस्ट केल्याने राजकीय तर्क-वितर्क केले जात आहेत.