मराठी महिला रिक्षाचालकाला मारहाण

परप्रांतीय सुरक्षारक्षकाला मनसेने दिला चोप

ठाणे : कल्याणमध्ये मराठी माणसाला परप्रांतियाकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एका मराठी महिला रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती कळताच मनसेने धाव घेत त्या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिला. रिक्षाचालक महिलेने भाडे नाकारल्यावरून हा वाद उद्भवला होता.

ठाण्यातील व्हिवियाना मॉलमध्ये खरेदी करून निघालेल्या एका ग्राहकाचे रिक्षाभाडे महिला रिक्षाचालकाने नाकारले. यावरून मॉलमधील सुरक्षा रक्षकाची महिला चालकासोबत वादावादी झाली. त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करत प्रकरण हातघाईवर आले. सुरक्षा रक्षकानेही महिला रिक्षाचालकावर हात उचलला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि महिला रिक्षा चालकांसोबत असलेल्या काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतली.

या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मॉल प्रशासनाला जाब विचारत सुरक्षा रक्षकाला घरून बोलावून घेत चोप दिला. तसेच संताप व्यक्त करून अविनाश जाधव यांनी संबधित सुरक्षारक्षकावर कारवाईची मागणी केली. महिला रिक्षा चालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन अशा घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.