‘आयपीएल’च्या प्रसारण हक्कांसाठी निविदा

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या अर्थकारणात मोठी उलाढाल करणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पुढील पाच हंगामांच्या प्रसारण हक्कांसाठी निविदा काढण्याच्या तयारीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आहे.

‘आयपीएल’च्या प्रसारण हक्कांसाठी ‘बीसीसीआय’ इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात लिलाव करणार असून त्यांना ५० हजार कोटींपर्यंतची बोली अपेक्षित आहे. या लिलावप्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात होणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी दिली. ‘‘दोन नवे संघ, अधिक सामने, चाहत्यांचा अधिक प्रतिसाद, अधिक मैदानांवर सामने. आम्हाला आता ‘आयपीएल’ला नव्या उंचीवर न्यायचे आहे. या लिलावप्रक्रियेमुळे आम्हाला केवळ महसूल मिळणार नसून भारतीय क्रिकेटचे खूप फायदा होणार आहे,’’ असेही शाह यांनी मंगळवारी ‘ट्वीट’ केले. यंदा ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला असून एकूण संघांची संख्या १० झाली आहे.

प्रसारण हक्कांसाठी निविदेच्या लिलावात ‘बीसीसीआय’ला मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. झी, सोनी आणि रियायन्स व्हायकॉम १८ हे समूह ‘आयपीएल’चे प्रसारण हक्क मिळवण्याचा प्रयत्न करतील.