ठामपाला अनुदानाचा आधार; अर्थसंकल्प पाच हजार कोटी पार

* नवीन प्रकल्प नाहीत
* करवाढ, दरवाढ नाही
* शहर सौंदर्यीकरण, मुलभूत सुविधांवर भर

ठाणे : ठाणेकरांचे प्रतिबिंब दिसणार, महिलांना समर्पित कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेला आणि काटकसरीवर भर देणारा पाच हजार २५ कोटी रुपयांचा ठाणे महापालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला आहे.

२०२३-२४ मध्ये आरंभींच्या शिल्लकेसह सुधारित ५९८८ कोटी नऊ लाख तर सन २०२४- २५ मध्ये आरंभीच्या शिल्लकेसह मूळ अंदाज ५०२५ कोटी एक लाख जमा बाजू या अर्थसकंल्पात मांडण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पाने पहिल्यांदाच पाच हजार कोटींच्या पुढचा पल्ला गाठला असला तरी यामध्ये कोणत्याही प्रकल्पाची घोषणा नाही. मात्र पायाभूत सुविधा वाढवणे, सेवा सुधारणे यावर भर देत सुंदर शहराला आरोग्याची जोड देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने मोठ-मोठ्या प्रकल्पांना कात्री लावून मध्यमवर्गीय ठाणेकरांना नजरेसमोर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेल्या योजनांचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. ठाणे स्वच्छ करण्याच्या योजनांना या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.

गुरुवारी महसुली खर्च ३३४५ कोटी ६६ लाख, भांडवली खर्च १६७९ कोटी, अखेरची शिल्लक ३५ लाख असा एकूण ५०२५ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२३ -२४ मध्ये ४३७० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात यंदा सुमारे ६५५ कोटींची वाढ दिसून आली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा आकार, अग्निशमन दल, जाहीरात, स्थावर मालमत्ता आदी विभागांच्या उत्पन्नात घट येत असली तरी देखील शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न ३१६० कोटी १६ लाखांऐवजी ३०९२ कोटी ३९ लाख सुधारीत करण्यात आले आहे.

महापालिकेने अपेक्षित केलेल्या ४६० कोटी ५ लाखांच्या अनुदानात ६९७ कोटी ९८ लाख वाढ होत असून सुधारीत अर्थसंकल्पात अनुदानापोटी ११५८ कोटी ३ लाख अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. तर डिसेंबर २०२३ अखेर ९८९ कोटी २९ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या अनुदानातील अर्खचित रकमा २०२३-२४ च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट आहेत. खर्चात २०२३-२४ मध्ये महसुली खर्च २७०८ कोटी ८३ लाख अपेक्षित केला होता. तो सुधारीत अर्थसंकल्पात २६७२ कोटी ७९ लाख अपेक्षित असून भांडवली खर्च १६६० कोटी ९१ लाख ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने तो २०४९ कोटी ४३ लाख सुधारीत करण्यात आले आहे. यात अतिरिक्त खर्च करणे टाळण्यात आले असून भांडवली खर्चावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

यंदा शहरभर शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार असून घंटागाडी योजना अंतर्गत ८० कोटी व कचरा वेचक मानधन व सोयी सुविधा यासाठी ४ कोटी ५० लाख तरतूद प्रस्तावित, नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५ कोटी, विकेंद्रीत पध्दतीने यांत्रिकी कचरा प्रक्रिया केंद्रसाठी १ कोटी ५० लाख, सार्वजनिक रस्ते सफाई ८५ कोटी, स्वच्छता मोहीम ३० लाख, सफाई कामगारांची आरोग्य तपासणी, सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, स्वच्छ शौचालय, खड्डेमुक्त ठाणे, रस्त्यांचा कामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी विशेष प्रयत्न, शहर सौंदर्यीकरणावर भर देताना प्रकल्प २.० राबविणे, यासाठी ५० कोटी, एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभिकरणासाठी २० कोटी, राज्य सरोवर संवर्धन योजना, ग्रीन संस्थेकडून तलाव संवर्धन आदींना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये महिला बचत गटांना शुन्य व्याज दराने कर्ज, धर्मवीर आनंद दिघे स्वंयरोजगार योजना, महिला बचत गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, महिलांसाठी विशेष परिवहन सेवा, महिला सुरक्षितता, माझी आरोग्य सखी, महिला शौचालय, मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना आदींसह इतर योजनांवर भर दिला जाणार आहे.

याशिवाय प्रसुतीगृहांचे बळकटीकरण, जेष्ठ नागरीकांसाठी सुविधा, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, दिव्यांग कल्याणकारी योजना, मुकबधीर बालक मुक्त ठाणे अभियान, औषध चिठ्ठीमुक्त रुग्णालये, आपला दवाखान्यांची संख्या वाढविणे, गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटलचे विस्तारीकरण, इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पीटल, कौसा हॉस्पाटील कार्यान्वित करण्याबरोबर याच ठिकाणी कर्करोग व उपचार व सुविधा निर्माण करणे, कळवा रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याबरोबरच मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरणे, सुंदर शाळा, निसर्ग वाचनालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावआने ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय, हरित विकास कार्यक्रम, प्रदुषण मुक्त व धुळमुक्त ठाणे, पाणी पुरवठा योजनेचे सक्षमीकरण, मलनिसारण योजना, वाहतुक कोंडी सोडविण्यावर भर तसेच पार्कींग व्यवस्था वाढविण्यावर भर, नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी प्रयत्न, क्लस्टर योजना, धर्मवीर आनंद दिघे स्मारक, आनंद आश्रम परिसर सुधारणा, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत व वसतीगृह, कला, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर, परिवहन सेवा मजबुतीकरण, उपर्दव शोधपथक, अ‍ॅडव्हास लोकॅलीटी मॅनेजमेंट आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.

मालमत्ता वाढीसाठी जीआयएस सर्व्हे

मालमत्ता कर हा महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहे. त्यानुसार २०२३-२४ मध्ये ७६१ कोटी ७२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर अखेर ४८१.३६ कोटी उत्पन्न आल्याने या करापासून ७३८ कोटी ७१ लाख सुधारीत करण्यात आले आहे. या कराची वसुली करण्यासाठी सवलत योजना देखील राबविण्यात आली होती. मालमत्ता करावरील शास्ती व व्याज माफीचा लाभही करदात्यांना झाला. तर २०२४ -२५ मध्ये मालमत्ता कर ८१९ कोटी ७१ लाख अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच वाढीव मागणी व त्यातून वाढणाऱ्या उत्पन्नातील भागिदारी तत्वावर मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे व त्यातून वाढ, मालमत्ता कराचा डेटा हा इतर विभागाच्या डेटा सोबत तुलनात्मक पुनर्पडताळणी करणे, त्यातून मालमत्ता कराचा डेटा सुधारीत होऊन मालमत्ता कराच्या मागणीत वाढ होणार आहे. शहर विकास विभागुरवठाशहर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५६५ कोटींचे उद्दीष्ट होते. परंतु उद्दीष्टापेक्षा अधिकची वसुली या विभागाने केली आहे. त्यानुसार २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात हे उद्दीष्ट ७५० कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे.

स्थानिक संस्था कर

स्थानिक संस्था कर अनुदानातून १०५७ कोटी ७९ लाख, मुंद्राक शुल्क अधिभारापोटी २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली १० कोटी असे एकूण १२६७ कोटी ७९ लाख उत्पन्न अपेक्षित होते. तर २०२४-२५ या वर्षात अनुदानापोटी ११४२.४२ कोटी, मुंद्राक शुल्क अधिभारापोटी २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली ८ कोटी असे १३५०.४२ कोटी उत्पन्न अपेक्षित.

पाणी पुरवठा विभागाची वसुली चिंतेची बाब

पाणी पुरवठा विभागाला २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु ६३.७६ कोटींची वसुली झाली असल्याने यंदा २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर पाणी बिलाची वसुली करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याबरोबर नळ संयोजन खंडीत करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय अनाधिकृत मालमत्तावंर शास्ती कर लावून मालमत्ता आणि पाणी बिलाची वसुली देखील त्याच पध्दतीने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय अग्निशमन दल १००.३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित, स्थावर मालमत्ता विभाग १२.१५ कोटी, जाहीरात फी पोटी २४.६२ कोटी, अनुदान २८४.३२ कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे.

पालिकेवर ९२.६२ कोटींचे कर्ज

महापालिकेची आर्थिक स्थिती आजही सावरतांना दिसून येत नाही. त्यात महापालिकेवर आजच्या घडीला ९३.६२ कोटींचे कर्ज शिल्लक असल्याचे दिसत आहे. यात केंद्र शासनाने अमृत २ अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारासाठी ३२३ कोटी रकमेचा डिपीआर मंजुर केला असून या अंतर्गत केंद्र शासनाचा २५ टक्के, राज्य शासनाचा २५ आणि महापालिकेचा ५० टक्के हिस्सा असणार आहे. महापालिका हिस्याची रक्कम ही म्युनिसिपल बॉन्ड उभारुन किंवा कर्जाद्वारे उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

११५८.३२ कोटींच्या अनुदानामुळे मोठे प्रकल्प शक्य

ठाणे महापालिकेला शासनाकडून आतापर्यंत ११५८.३२ कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून या अनुदानाच्या माध्यमातून शहरात मोठे आणि महत्वाचे प्रकल्प राबवणे पालिकेला शक्य झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे नूतनीकरण आणि आरोग्य तसेच स्वच्छतेचे अनेक उपक्रम पालिकेच्या वतीने राबवण्यात आले आहे.

औषध चिट्ठीमुक्त रुग्णालये

महापालिकेची रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये औषध चिट्ठीमुक्त ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना केस पेपर काढण्याची आवश्यकता नसून त्याच ठिकाणी रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचे विस्तारीकरण

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होत असून रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून यासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कौसा रुग्णालयात होणार कर्करोगांवर मोफत उपचार

पालिकेचे कौसा रुग्णालय हे खाजगी लोकसहभागातून चालवण्यात येत असून सर्व प्रकारच्या सुपरस्पेशालिटी सुविधा देण्यात येत आहे. त्याचसोबत आता या ठिकाणी कर्करोगांवर देखील मोफत उपचार केले जाणार असून कर्करोगांवर मोफत उपचार करणारी ठाणे महापालिका ही भारतामधील पहिली महापालिका असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

अंत्यविधीसाठी शुल्क आकारले जाणार नाही

अंत्यविधीसाठी मोफत लाकडे देण्यासोबत इतर साहित्य मोफत देण्यात यावे ही मागणी अनेक वर्षांपासून ठाणेकरांची होती. मुंबई प्रमाणे ठाण्यातही अंत्यविधी मोफत करण्यात यावे या मागणीचा अखेर यावर्षी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे ठाण्यात स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यविधी होणार असल्याने गोरगरीब जनतेचा मोठा भार हाकला होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालयाची निर्मिती

शहरात ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार आहे. सदर ग्रंथालय हे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणार असून त्यामध्ये ई बुक, ऑडिओ बुक, लेखक वाचक संवाद, चर्चासत्रे , लिखाणासाठी पोषक वातावरण असे या ग्रंथालयाचे स्वरूप असेल. सदरचे ग्रंथालय साधारणपणे 33000 चौ.फूट एवढे प्रशस्त असणार आहे. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असे मध्यवर्ती ग्रंथालय उभे राहील. सदर ग्रंथालयाचे नाव “मा.नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय” ठेवण्याचे नियोजित आहे. सदर ग्रंथालय हे विकासकामार्फत कन्‍स्ट्रक्शन टिडीआरच्या माध्यमातून विनामूल्य विकसित करण्यात येणार आहे. सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात ” ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय” या लेखाशीर्षांतर्गत १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना

ठाणे महानगरपालिका हद्दीतील पूर्व द्रुतगती महामार्गावरील माजिवडा जंक्शनवर गोल्डन डाईज सर्कल येथे घोडबंदर रोडकडून मुंबई व ठाणे रेल्वे स्टेशनकडे, मुंबई कडून घोडबंदरकडे व नाशिक-भिवंडी कडून येणारी घोडबंदर रोडकडे जाणारी वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. सदर ठिकाणी वाहतुक नियोजन करणेकरीता स्वयंचलित वाहतुक सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.के.व्हीला ते साकेत रोड च्या दरम्यानचा नाला बंदिस्त करुन माजिवडा वरुन येणारी वाहतूक थेट नवीन कळवा पुलाकडे वळविण्याचे काम सुरु असून सदरचे काम या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.घोडबंदर रस्त्यावर नेहमी वाहतुक कोंडी होत असते. ही वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी अस्तित्वातील रस्ता मोठा करण्यासाठी लगतचे सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यात करुन घोडबंदर रस्ता प्रशस्त करण्याचे प्रयोजन आहे. सदर काम एम.एम.आर.डी.ए. कडून मंजूर झाले असून प्रत्यक्षात कामाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे.

सात मजली पार्किंग व्यवस्था

वागळे इस्टेट परिसरात एमआयडीसीच्या प्लॉटवर सात मजली पार्कींग व्यवस्था विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. नौपाडा येथील शाहू मार्केट व बहुमजली पार्कींग खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.गडकरी रंगायतन शेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर पार्कींग व्यवस्था, महापालिका क्षेत्रात पार्कींगसाठी आरक्षित भूखंड तसेच शहर विकास विभागामार्फत उपलब्ध झालेले सुविधा भूखंड. तसेच ठाणे रेल्वे स्टेशन येथील पुनर्विकासांतर्गत पार्कींग व्यवस्थेची सुविधा खाजगी भागिदारी तत्वावर विकसित करणे प्रस्तावित आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक अखेर होणार

धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक ठाणे शहरात व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासूनची आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार उपवन येथील महापौर निवास या वास्तुमध्ये धर्मवीर आनंद यांचे स्मारक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सभोवतालच्या परिसराचा देखील विकास केला जाणार आहे. सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे महापौर निवास हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आनंदाश्रम बाहेरील परिसर सुधारणार

सर्व शिवसैनिकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणा-या आनंदाश्रम परिसराचा सौंदर्यांत्मक विकास करण्यासाठी सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते दुभाजक, शोभीवंत दिवे, साईनेजेस, भित्तीचित्रे, म्युरल्स इत्यादी बाबी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी या आर्थिक वर्षात आनंदाश्रम परिसर सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उपद्रव शोधपथक

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार शहराचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले आहे, मात्र काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अथवा लघुशंका करणे असे प्रकार करत असल्याने यावर उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उपद्रव शोधपथक स्थापन करण्यात येणार आहे. प्रती पथक 2 सुरक्षा रक्षक असलेले 50 उपद्रव शोध पथक तयार करण्यात येणार आहेत. ही पथके प्रभाग स्तरावर गस्त घालून जे नागरिक उपद्रव निर्माण करतील, अशा व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.