बदलापूर: ठाणे जिल्ह्यासह इतर महापालिकांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण अखेर भरून वाहू लागले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वर्षभर पाणीदिलासा मिळतो. यंदा बारवी धरण गेल्या वर्षाच्या तुलनेत संथगतीने भरले. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संततधार पावसामुळे बारवी धरण वेगाने भरले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धरण भरण्याची शक्यता वाटत होती. मात्र पावसाने पुन्हा दडी दिल्याने धरण भरल्याचा वेग मंदावला. गुरूवारी बारवी धरण ९९ टक्क्यांपर्यंत भरले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत बारवी धरणात ९९.७६ टक्के पाणी भरले होते. बारवी धरणात एकूण ३३८.०४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून बारवी धरणात काठोकाठ पाणी भरलेले होते.