ठाण्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियम हे विजय हजारे ट्रॉफी २०२३ आयोजित करणाऱ्या नऊ ठिकाणांपैकी एक आहे. रणजी ट्रॉफी मधील ३६ संघ या रोमांचक देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विजय हजारे ट्रॉफी आयोजित करण्यासाठी ठाण्याची निवड केवळ दुसऱ्यांदा केली गेली आहे. २०२१ मध्ये विजय हजारे ट्रॉफी प्रथमच ठाण्यात खेळली गेली.
यंदा दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सात सामने होणार आहेत. यातील पहिला सामना २३ नोव्हेंबर रोजी बडोदा आणि पंजाब यांच्यात खेळला गेला. क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोद्याने २१४ धावांचा बचाव केला आणि फक्त तीन धावांनी सामना जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाबच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. त्यांनी बडोद्याला ५० षटकांत २१४/९ ला रोखले. ३३ वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज बलतेज सिंग हा पंजाबसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात (ज्यात एक मेडन देखील होती) २७ धावा देऊन चार विकेट्स पटकावल्या. बडोद्यासाठी शिवलिक शर्माने ६९ चेंडूत ५१ धावा केल्या.
प्रत्युत्तरात पंजाबने एकूण धावसंख्येचा जवळपास पाठलाग केला, परंतु ४९ षटकांत २११ धावांत गुंडाळल्यामुळे त्यांना केवळ तीन धावा कमी पडल्या. निहाल वढेरा (४९) आणि सिद्धार्थ कौल (४७) यांनी झुंज दिली पण ते त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. बडोद्याचे वेगवान गोलंदाज अतित शेठ आणि बाबाशफी पठाण यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेऊन कमालीचे प्रदर्शन केले.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पुढील सामना २५ नोव्हेंबर रोजी गोवा आणि तामिळनाडू यांच्यात होणार आहे. दिनेश कार्तिक, विजय शंकर, वरुण चक्रवर्ती, टी नटराजन, राहुल त्रिपाठी, सुयश प्रभुदेसाई आणि अर्जुन तेंडुलकर हे काही प्रमुख खेळाडू या सामन्यात दिसणार आहेत.