ठाणे : कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आणि भायखळा या भागातून आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांनी ठाणे शहरातील रस्ते व्यापून टाकले असून या फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी फेरीवाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील मुख्य चौक, स्टेशन भागातील रस्ते तसेच कळवा, खारीगाव, मुंब्रा गुलाब मार्केट, कौसा, घोडबंदर, वर्तकनगर, किसन नगर, इंदिरा नगर, या भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. काही गावगुंडांना हाताशी धरून हे फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करतात. तसेच स्टेशन भागात रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांचा हैदोस सुरु असतो. या फेरीवाल्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने दिवसेंदिवस ठाण्यातील रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. या फेरीवाल्यांमध्ये बांग्लादेशातील फेरीवाले असण्याची भीती अनेक ठाणेकरांनी व्यक्त केली आहे.
ठाणे महापालिका फेरीवाला धोरणाची अंबलबजावणी करत नाही, त्यामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले वाढले आहेत. मागिल अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिक प्रामाणिक फेरीवाल्यांनी सांगितले. जे फेरीवाले वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत त्यांची नोंदणी करून त्यांना व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांची जागा निश्चित केल्यास ठाण्यात फेरीवाल्यांची संख्या वाढणार नाही, असे देखिल एका जागरूक ठाणेकराने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
पोलिस आणि ठाणे महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी ठाणेकरांनी केली आहे.
ठाणे महापालिकेने सर्वेक्षण केले तेव्हा अवघ्या सहा हजार फेरीवाल्यांनी आपली कागदपत्रे दिली होती, परंतु ठाणे शहरातील रस्त्यांवर किमान २० ते २५ हजार फेरीवाले धंदा करत असतील असा अंदाज आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी या फेरीवाल्यांची कागदपत्रे तपासून घ्यावीत, अशी मागणी जागरुक ठाणेकर करत आहेत.
स्टेशन परिसर, पाचपाखाडी भागात वसुली वाढली
महापालिका मुख्यालय, चंदनवाडी, रायगड गल्ली हरिनिवास, खाऊगल्ली आदी परिसरात फेरीवाल्यांची संख्या मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्याकडून तथाकथित कार्यकर्ते आणि गावगुंडांकडून रोज दोनशे ते ५०० रुपये वसुली केली जात असल्याची चर्चा आहे. या फेरीवाल्यांमध्ये देखील बांग्लादेशी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हीच परिस्थिती जांभळी नाका गणपती मंदिरापासून प्रभात सिनेमा आणि पुढे अशोक सिनेमापर्यंत आढळून येते. येथील फेरीवाल्यांवर आणि तथाकथित कार्यकर्ते आणि गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.