भारताची डोकेदुखी वाढणार
ढाका : बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून भारतासोबतचे संबंध बिघडले आहेत. अशातच, चीन दौऱ्यावरुन परतलेले बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार (प्रमुख) मोहम्मद युनूस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते चीनला भारताच्या सीमेजवळ आपली उपस्थिती वाढवण्याचे आमंत्रण देताना दिसतात. या व्हिडिओमध्ये युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर भाष्य केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहम्मद युनूस चिनी सरकारला बांग्लादेशमध्ये ‘चिकन नेक’जवळ आर्थिक तळ स्थापन करण्याचे निमंत्रण देत आहेत. युनूस म्हणाले की, भारतातील ईशान्येकडील सात राज्ये (सेव्हन सिस्टर्स) अजूनही लँड लॉक, अर्थात सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेली आहेत. व्हिडिओमध्ये, युनूस दावा करतात की, बांग्लादेश हा या प्रदेशातील महासागराचा (हिंद महासागर) एकमेव संरक्षक आहे. भारतातील ईशान्येकडील सात राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. आम्ही या संपूर्ण प्रदेशासाठी महासागराचे एकमेव संरक्षक आहोत. त्यामुळे चिनी अर्थव्यवस्था येथे विस्तारू शकते, असेही युनूस व्हिडिओत म्हणाले.
काय आहे चिकन नेक?
चिकन नेक हा भारतातील ईशान्येकडील राज्ये (सेव्हन सिस्टर्स)-नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूर यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा भाग आहे. याला सिलीगुडी कॉरिडॉर म्हणूनही ओळखले जाते. हा कॉरिडॉर भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, या भागात चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. चिकन नेक बांग्लादेशच्या सीमेवरून जातो आणि युनूसने चीनला या भागात व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.
मोहम्मद युनूस चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी चीनकडे नदी जल व्यवस्थापनासाठी 50 वर्षांचा मास्टर प्लॅन मागितला. यामध्ये तीस्ता नदीचे पाणी व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे, ज्याचे पाणी देखील भारताने सामायिक केले आहे. तीस्ता नदीच्या पाण्यावरून भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरू आहेत. नदीच्या जल व्यवस्थापनाच्या मास्टर प्लॅनबद्दल बोलताना युनूस यांनी चीनला ‘पाणी व्यवस्थापनाचा मास्टर’ म्हटले.
युनूस यांच्या चीन दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी सागरी सहकार्य वाढविण्याचे आणि गरज पडल्यास त्यावर चर्चा करण्याचे मान्य केले आहे. बांग्लादेश मोंगला बंदर सुविधांच्या आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी चीनी कंपन्यांसमोर हात पसरत आहे. बांग्लादेशच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, चीनने बांग्लादेशच्या दक्षिण-पश्चिम मोंगला बंदराच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे $400 दशलक्ष, चीन औद्योगिक आर्थिक क्षेत्राच्या विकासासाठी $350 दशलक्ष आणि तांत्रिक सहाय्य म्हणून $150 दशलक्ष देण्याची योजना आखली आहे.