आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश; पाच कोटी निधी मंजूर
ठाणे : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महापालिका हद्दीमध्ये उपवन, कासारवडवली व मोघरपाडा येथे जुने तलाव असून या तलावांचे जतन करण्यासाठी ’बनारस घाटा“च्या धर्तीवर या तलावांवर घाटांचे बांधकाम करून त्या ठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसवण्यात येणार आहे. या तलावांचे सुशोभीकरण करण्यासाठी २५ कोटींचा निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती.
आमदार प्रताप सरनाईक यांच्याच संकल्पनेतून ठाण्यातील उपवन तलावाजवळ बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाट बनविण्यात आला असून तेथे अनेक धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभरात होतात. तेथे संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून दरवर्षी होणाऱ्या ’उपवन आर्ट फेस्टिवल“ला लाखो नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे कासारवडवली व मोघरपाडा ह्या दोन मोठ्या तलावांवर ’उपवन घाटाप्रमाणे बनारस घाटा“च्या धर्तीवर घाट बांधले जावेत अशी श्री.सरनाईक यांची संकल्पना आहे.
श्री गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, छटपूजा यासह हिंदू धर्मातील सर्व उत्सव करण्यासाठी लोक तलावाजवळ जमत असल्याने येथे चांगला घाट बांधण्यात येईल. तसेच तलावात म्युझिकल फाऊंटन लावले जातील व त्यावर लाईट इफेक्ट्स देण्यात येतील. तलावांचे सुशोभीकरण करण्याचे संकल्पचित्र तयार आहे. तसेच ‘म्युझिकल फाऊंटन’ बसवून तेथे संगीत कारंज्याचे म्हणजेच म्युझिकल फाऊंटनचे दररोज सायंकाळी ’शो“ ठेवले जातील. ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि पर्यटकही येऊ शकतील व त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असे आमदार सरनाईक म्हणाले. या कामासाठी राज्य शासनाने पाच कोटी इतका निधी वर्ग केल्याने ठाणे महापालिका निविदा प्रक्रिया करून याच वर्षात कामाला सुरुवात करेल, अशी अपेक्षा श्री.सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
कासारवडवली व मोघरपाडा येथील तलावांवर ’बनारस घाटा“च्या धर्तीवर घाटांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी १० कोटी व उपवन, कासारवडवली व मोघरपाडा या तीन तलावांमध्ये संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसविण्यासाठी पाच कोटी असे एकूण २५ कोटी राज्य सरकारकडून मंजूर करण्यासाठी आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नाना यश आले असून पहिल्या टप्यात राज्य सरकारने पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. ’महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास“ या योजने अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याने राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे, असे सरनाईक म्हणाले. या कामासाठी निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या कामामुळे या तीन मोठ्या तलावांचे रूप पूर्णपणे पालटणार असून तेथे ’म्युझिकल फाउंटन“ बसवून म्युझिकल फाउंटनचे दररोज शो येथे होतील, अशी माहिती आमदार श्री. सरनाईक यांनी आज दिली.