मेट्रो-४ च्या कामांमुळे वाहतुक व्यवस्थेत मोठे बदल
ठाणे : ठाणे शहरातून जाणाऱ्या मेट्रो-४च्या कामांसाठी घोडबंदर मार्गावर मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
आनंद नगर ते कासारवडवलीच्या दरम्यान मेट्रो-४ साठी गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असून यामध्ये कापूरबावडी येथून भिवंडीमार्गे वसई-विरार, गुजरातच्या दिशेने वाहतुक करता येणार आहे. या वाहतूक बदलांमुळे पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
घाटकोपर ते कासारवडवली हा मेट्रो -४ मार्ग ठाणे शहरातून जाणार आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गावर ‘यु’ आकाराचे गर्डर उभारण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केले आहे. या कामासाठी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर मध्यरात्री बंदीचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला आहे. या वाहतुक बदलामुळे मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी असेल. हे वाहतुक बदल दररोज रात्री १२ ते पहाटे पाच यावेळेत २८ नोव्हेंबरपर्यंत दररोज लागू असतील.
ठाणे शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच पर्यंत प्रवेश आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या वेळेत घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने हे वाहतूक बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी चौक येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने माजिवडा येथून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने गॅमन मार्गे, खारेगाव खाडी, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंदी आहे. येथील वाहने मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.