ठाणे: ठाणेकर खेळाडू प्रणय शेट्टीगर याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच महिन्यात सलग पाच सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
राष्ट्रीय स्तरावर सातत्याने कामगिरी बजावणाऱ्या प्रणयने आपले क्रमवारीतील स्थान कायम अव्वल ठेवले आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्या या कामगिरीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रमवारीत देखील झेप घेतली आहे.
नॉर्वे येथे झालेल्या एफ झेड फोर्झा नॉर्वेजियन इंटरनॅशनल स्पर्धेत त्याने राऊंड ऑफ १६ मध्ये इंडोनेशिया च्या बलाढ्य मिकोलाज याला १६-२१,२१-११,२१-१३ असे हरवून पुढच्या फेरीत प्रवेश घेतला. या स्पर्धेत त्याला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. परंतु या स्पर्धेपासून प्रणयची विजयी धुरा सुरू झाली.
झेक रिपब्लिक येथे झालेल्या झेक ज्युनियर इंटरनॅशनल ओरलावा या स्पर्धेत १९ वर्षा खालील मुलांमध्ये प्रणयने राऊंड ऑफ १६ मध्ये झेक रिपब्लिकच्याच लुकास पत्झक याचा २१-१८,११-२१,६-२१ असा दणदणीत पराभव केला. उप उपांत्य फेरीत भारताच्या विश्वजित चौधरीला हरवले. तर उपांत्य फेरीत भारताच्याच अभिषेक कनपाला २१-१४,२१-१२ असे हरवले. अंतिम फेरीच्या सामन्यात त्याची गाठ ताइवानच्या मा चेंग या सोबत होती. त्याचा प्रणयने २१-१५,२१-१३ असा पराभव केला आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली.
स्लोवाकिया येथे झालेल्या स्लोवाक ज्युनियर इंटरनॅशनल स्पर्धेत एकेरी आणि दुहेरी दोन्हीं गटांमध्ये प्रणयने सुवर्णपदक पटकावले आणि हॅटट्रिक केली. 19 वर्षाखालील मुलांमध्ये त्याने रणदीप सिंग याला साथीला घेऊन उप उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडची जोडी हुगो आणि लियानो पांझा यांचा १७-२१,२१-१५,२१-१३ असा पराभव केला. तर उपांत्य फेरीत झी हीन चोंग आणि ली ताओ या मलेशियन जोडीचा २१-१७,२१-१७ असा पराभव केला. तर अंतिम फेरीत वोजटेक आणि पॅट्रिक या झेक रिपब्लिकन जोडीचा २१-१४,२१-१३ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
एकेरीत स्लोवाकियाच्या झिगा याला २१-१६,२१-४ असे हरवून प्रणयने उपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीत त्याने मलेशियाच्या ली ताओ याला पुन्हा एकदा२१-११,२१-१२ असे हरवले. तर ताइवानच्या मा चांग यी याला पुन्हा एकदा अंतिम फेरीत २१-१४,२१-१६ असे हरवले आणि आपली सुवर्ण पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली.
या पुढे पोर्तुगाल येथे झालेल्या ज्युनियर इंटरनॅशनल स्पर्धेत प्रणयने पुन्हा एकदा एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि केवळ महिन्याभरात एकूण पाच सुवर्णपदके आपल्या नावे केली. रणदीप सिंग याला साथीला घेऊन त्याने अंतिम फेरीत फ्रान्सच्या एक्सेल आणि मतियास दुरू यांचा २१-१५,२१-१७ असा पराभव केला आणि चौथ्या सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली.
तर एकेरीत नेदरलँडस्च्या आदिथ कार्थिकेयन याचा पराभव करून एकूण ५ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली.
या गौरवास्पद कामगीरीबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर, मयूर घाटणेकर आणि विघ्नेश देवळेकर तसेच क्रीडा अधिकारी मिनल पालांडे व ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने देखील प्रणयला शुभेच्छा दिल्या आहेत आणि कौतुक केले आहे.