ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत गेले वर्षभर प्रशिक्षण घेणाऱ्या मालविका बनसोड हिने आपल्या उत्तम खेळाच्या जोरावर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीत आणि कामगिरीत गरुडझेप घेतली आहे.
मालविका ही मूळची नागपूरची असून गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळत आहे आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या रँकिंगमध्ये ती ४५व्या स्थानावर आहे. तिने आपल्या देशातील तसेच परदेशातील काही अव्वल खेळाडूंविरुद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक उल्लेखनीय विजय मिळवले आहेत. ज्यात काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या इंडिया ओपन सिरीजमधील सायना नेहवाल विरुद्ध झालेल्या सामन्यातील मिळवलेला यादगार विजय देखील सामील आहे!
तिच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाचा 2020-21 सालचा प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देखील तिला प्रदान करण्यात आला आहे.
नुकत्याच चांगझाओ चायना येथे पार पडलेल्या विक्टर चायना ओपन एच एसबीसीबीडब्ल्यूएफ वर्ल्ड सुपर 1000 इंटरनॅशनल टूर्नामेंट या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत मालविकाने सहभाग घेतला होता.
या प्रतिष्ठित स्पर्धेत अंडरडॉग म्हणून सुरुवात करून देखील मालविकाने आपल्या अभूतपूर्व कामगिरीने उपांत्य फेरीत धडक मारली आणि इतिहास घडवला. या स्पर्धेतून आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद तिने केली परंतु उपांत्य पूर्व फेरीत तिला पराभव स्वीकारावा लागला. बिगर मानांकित मालविकाने प्रथम जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारीसका या मानद खेळाडूचा 26-24, 21-19 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिने स्कॉटलंडच्या जागतिक क्रमवारीत २६व्या क्रमांकावर असलेल्या आणि दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेतील एकेरीचे सुवर्ण पदक विजेत्या क्रिस्टी गिलमोरचा १७-२१,२१-१९,१६-२१ अशा तीन सेटमध्ये पराभव केला.
हा थरारक सामना १ तास ५ मिनिटे चालला. दुर्दैवाने, क्वार्टर फायनलमध्ये तिची गाठ जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या माजी वर्ल्ड चॅम्पियन जपानच्या अकाने यामागुचीशी होती जिच्याकडून मालविकाला 10-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. 2018 नंतर चीनमध्ये ह्या प्रतिष्ठित चॅम्पियनशिपमध्ये क्वार्टर फायनल्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या पी.व्ही. सिंधू नंतर मालविका ही भारतातील दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.
“मालविका अत्यंत जिद्दी, मेहनती आणि प्रामाणिक खेळाडू आहे, जी एक तास चाललेल्या सामन्यात सातत्यपूर्ण वेगाने कोर्टवर टिकू शकते. तिच्या सोबत देशासाठी खेळणाऱ्या इतर खेळाडूंच्या पॉवर गेमपेक्षा ती तंत्रशुद्ध स्ट्रोक्स आणि डिसेप्टिव्ह खेळावर जास्त अवलंबून असते”असे मत तिचे प्रशिक्षक व ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे मुख्य श्री. श्रीकांत वाड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी देखील मालविकाच्या या कामगिरीबद्दल तिचे तोंड भरून कौतुक व अभिनंदन केले आहे आणि तिला भविष्यातील प्रत्येक यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मालविकाच्या या यशात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या सर्व प्रशिक्षक आणि तसेच खेळाडूंनी केलेल्या मदतीचा मोठा वाटा आहे असे मालविकाने आणि तिच्या पालकांनी आवर्जुन नमूद केले.
या घवघवीत यशाबद्दल क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी देखील मालविकाचे तोंड भरून कौतुक केले आहे आणि यापुढे तिला लागेल ती मदत आपण वेळोवेळी करू असे देखील आश्वासन दिले आहे.