दुचाकी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

एकजण गंभीर जखमी

शहापूर : शहापूर-शेणवा मार्गावरील शेलवली येथे सोमवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरात धडक बसून अपघात झाला. यामध्ये रानविहीर येथील बाप-लेकाचा मृत्यू झाला असुन एक युवक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

रानविहीर येथे राहणारे गणपत चाहु रिकामे (67) व नितीन रिकामे (35) हे आपल्या कामासाठी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असतांना समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. समोरील दुचाकीवरील यतीन पानसरे रा.कंळबे (23) हा गंभीर जखमी असुन रूग्णालयात पुढील उपचार घेत आहे.

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी वाहन क्रमांक एमएच-०४-८७४९ आणि एमएच-०४-६५७८ या दोन्हीही गाड्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. एकाच घरातील बाप-लेकाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान शहापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत.