ठाणे: ठाण्यातील अवघा १४ वर्षांचा जलतरणपटू आयुष तावडे याने मुर्शिदाबाद कलकत्ता येथील भागिरथी नदीत ७८व्या जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या स्पर्धेत ८१ किमीचे अंतर १२ तास २० मिनिटांत पार करुन पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
८१ किमीचे अंतर पोहून जाणारा आयुष तावडे हा स्पर्धेतील सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयुष तावडे हा ठाण्यातील पाचपाखाडी येथील सरस्वती सेकंडरी स्कूल येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. तसेच तो ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित जलतरणाचा सराव ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
ठाणे महापालिकेचे कर्मचारी प्रविण तावडे यांचा तो सुपुत्र आहे.
नुकत्याच बँकॉक येथे झालेल्या आशियाई निमंत्रित जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या पाच वर्षीय रेयांश खामकर याने दोन रौप्य आणि दोन कांस्यपदक प्राप्त केले. तर खनक दिनेश कर्डे या जलतरणपटूने एक रौप्य आणि दोन कांस्यपदक पटकाविले आहे. या दोन्ही जलतरणपटूंचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जलतरण हौशी जलतरण संघटनेचे आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने आणि इतर पदाधिकारी तसेच ठाणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मीनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक रिमा देवरुखकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.