रेल्वे स्थानके की निवारा स्थानके?

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर बेघरांचे बस्तान

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सिडकोच्या माध्यमातून उभारलेल्या रेल्वे स्थानकांची देशातील आधुनिक स्थानके म्हणून गणना केली जात होती. याच रेल्वे स्थानकांची सिडकोच्या माध्यमातून योग्य देखभाल राखली जात नसल्याने यांचा ताबा आता बेघरांनी घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना विशेषतः महिला वर्गाला या स्थानकातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहराला स्वच्छतेत अग्रेसर ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिका दरवर्षी कंबर कसत असते. महापालिकेसोबतच शहरात सिडको, एमआयडीसी ही प्राधिकरणे देखील असून त्यांच्या मालमत्ता आहेत. या प्राधिकरणांनी विशेषतः सिडकोने स्वच्छतेकडे पाठ फिरवली असल्याने रेल्वे स्थानकांचा ताबा बेघरांनी घेतला आहे.

नवी मुंबई शहरात हार्बर आणि ट्रान्स हार्बर अशा दोन मार्गावर रेल्वे धावतात. या मार्गावर सिडकोने अत्याधुनिक अशी रेल्वे स्थानके उभारली आहेत. यातील नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली आदी रेल्वे स्थानकांवर सध्या बेघरांचा रहिवास दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने या स्थानकांना बकालपणा आला आहे. या ठिकाणी बेघरांचे बस्तान रेल्वे स्थानकालगत असलेल्या जागेवर वसले आहे. फूटपाथवर राहणारे बेघर नागरिक त्याच ठिकाणी आपला संसार थाटून बसलेले आहेत. यांच्याकडून परिसरात घाणीच साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराला बकालपणा आला आहे.

या ठिकाणीं रेल्वे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेवरच बेघरांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास तर सहन करावा लागतच आहे, शिवाय हे झोपडपट्टीधारक त्याच ठिकाणी संसार थाटून बसल्याने त्याच ठिकाणी अंघोळ, कपडे-भांडी धुतली जात आहेत. त्यामुळे ही रेल्वे स्थानक परिसर आहे की झोपडपट्टी?अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यावर सिडको तसेच महापालिकेने कारवाईची तत्परता दाखविली नाही. त्यामुळे हा परिसर कधी स्वच्छ होणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.