कराटे हे एक पारंपारिक जपानी मार्शल आर्ट आहे जे स्ट्राइकिंग तंत्रावर भर देते. जसे की पंच, किक आणि गुडघ्याचे स्ट्राइक तसेच ब्लॉक्स आणि इव्हेशन्स. कराटे प्रॅक्टिशनर्स देखील अनेकदा खेळादरम्यान प्रशिक्षण घेतात, जे स्व-संरक्षण परिस्थितीचे अनुकरण करणारे हालचालींचे पूर्वनियोजित क्रम असतात. याचे मूळ उद्दीष्ट शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकास करणे आणि आपल्या आत्मविश्वासाची वृद्धी करणे आहे. या कलेच्या प्रशिक्षणातील मूलभूत सिद्धांतामध्ये ध्यान, समर्थता, संयम, आत्मसंयम, ताण आणि तत्त्वज्ञान या सर्वांची महत्त्वाची भूमिका आहे.
कराटे शिकण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे फिटनेस. या क्रीडा प्रकारामुळे शारीरिक क्षमतांमध्ये वाढ होते. कराटेमुळे संयम व जीवनात सुदृढता आणि स्थिरता येते. कराटे शिकताना आत्मविश्वास वाढतो. हे जीवनातील कोणत्याही क्षेत्रात उपयोगी आहे.
खेळाचा इतिहास
कराटे (Karate) एक जापानी मार्शल आर्ट्स आहे ज्याची उत्पत्ती ओकिनावा (Okinawa) नावाच्या द्वीपावरून होते. ओकिनावा हे द्वीप जपानच्या दक्षिणेस आहे आणि याला जपानच्या कराटे प्रेमियांचे सर्वात प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. कराटे हे विश्वातील एक अत्यंत प्राचीन मार्शल आर्ट्स म्हणून ओळखले जाते.
कियो अकॅडमी
ठाण्यातील कियो अकॅडमी ही कराटे प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. ही अकॅडमी गेल्या सात वर्षांपासून कराटे प्रशिक्षण देत आहे. येथे कराटेचे तांत्रिक शिक्षण घेतलेले व अनुभवी असे तीन कोच कराटेचे प्रशिक्षण देतात. गेल्या काही वर्षात येथून शेकडो मुले कराटे शिकलेली आहेत. सध्या येथे अंदाजे पन्नास मुले प्रशिक्षण घेत आहेत. इतर खेळांप्रमाणे कराटेमध्ये सुद्धा विविध स्तरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात. कराटेच्या विविध स्पर्धांमध्ये येथील मुले सहभागी होत असतात. या अकॅडमी मधील सात मुलांनी राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत भाग घेतला आहे. ठाण्यातील खेळाडूंचा कियो अकॅडमीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मी आता १६ वर्षांची असून गेली तीन वर्ष कियो अकॅडमी येथे कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. या खेळातील व्यायाम आणि विविध प्रकारच्या तंत्रांमुळे मी कराटे शिकण्यास सुरुवात केली. ज्यामुळे माझे मन आणि शरीर मजबूत झाले आहे. मी कराटेच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने मला वेगवेगळ्या राज्यांतील खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करण्याची उत्तम संधी मिळाली. प्रत्येकवेळी मला वेगवेगळ्या प्रशिक्षकांकडून तसेच खेळाडूंकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले.
(आर्य विखारे, विद्यार्थी, कियो अकॅडमी)मी गेली अठरा वर्ष कराटे शिकत आहे. मागील आठ वर्षांपासून मी कियो अकॅडमी येथे कराटेचे प्रशिक्षण देत आहे. मी पूर्ण वेळ कराटेचे प्रशिक्षण देत असून अनेक शाळांमध्ये जाऊनही मी मुलांना प्रशिक्षित करतो. भारत-श्रीलंका टोकी कराटे स्पर्धेत मी टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आणि कांस्यपदक जिंकले आहे. कराटे शिकण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येकाने विशेषतः मुलींनी कराटेचे प्रशिक्षण घेणे सध्याच्या काळात गरजेचे आहे. कराटे हा क्रीडा प्रकार अडथळ्यांवर मात करण्यास आणि ध्येय निश्चित करण्यात मदत करतो.
(कश्यप भानुशाली, प्रशिक्षक, कियो अकॅडमी)
स्वस्तिक मार्शल आर्ट अकॅडमी
ठाण्यातील ही कराटे अकॅडमी वीस ते बावीस वर्षे जुनी आहे. येथे सहा प्रशिक्षक कराटेचे प्रशिक्षण देतात. या अकॅडमीमधून ठाण्यातील अनेक खेळाडूंनी कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे. येथील सर्व प्रशिक्षक अनुभवी व प्रशिक्षित असल्याने येथे शिकणाऱ्या प्रत्येकाकडे व्यक्तीगतरित्या लक्ष दिले जाते. कराटे हा उत्तम व्यायाम असून स्वसंरक्षणासाठीचा उत्तम मार्ग आहे. कराटेमुळे मनही शांत राहते. कोलशेत, घोडबंदर रोड आदी अनेक लांबच्या ठिकाणांहून या अकॅडमीमध्ये विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात. एकूणच या अकॅडमीला ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कराटेमधील अनेक स्पर्धा, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय त्याचसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा या अकॅडमीमधील अनेक मुले सहभागी झाली आहेत.
मी तिसरीत असतानाच कराटेचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. लहानपणापासून मला मैदानी खेळाची आवड होती. त्यातूनच कराटेची आवड निर्माण झाली. या खेळात नियमितता, शिस्त तसेच व्यायाम, शारीरिक क्रियांचा समावेश आहे. कराटे शिकायला सुरुवात केल्यानंतर मला माझ्यात अनेक बदल जाणवले. यातील महत्वाचा बदल म्हणजे माझ्यात धीटपणा आला. मी कराटेच्या नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात मला सुवर्ण, रौप्य दोन्ही पदकं मिळालीआहेत.
(तनिष्का लावण, विद्यार्थी, स्वस्तिक मार्शल आर्टस् अकॅडमी)
आम्ही गेली अनेक वर्षे कराटेचे प्रशिक्षण देत आहोत. कराटेमुळे आपल्याला अनेक फायदे होतात. विशेषतः मुलींनी कराटेचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. कराटेमध्ये अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचसोबत या खेळासाठी सरकारी योजना व शिष्यवृत्तीही दिल्या जातात. आमच्या अकॅडमीमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. येथे कराटेसोबत फेन्सिंग, आर्चरी, थाय बॉक्सिंग, लाठी-काठी आदी खेळांचे प्रशिक्षणही दिले जाते. ठाण्यात दिवसेंदिवस कराटे शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
(बाळा साठे व दीपाली साठे, प्रशिक्षक, स्वस्तिक मार्शल आर्टस् अकॅडमी)