माणकोली पुलाच्या उद्घाटनाची प्रतिक्षा, प्रवाशांचा आंदोलनाचा इशारा

ठाणे : गेल्या ऑगस्ट 2016 मध्ये माणकोली पुलाचे भूमिपूजन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. पुलाची कामे 36 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र आता नऊ वर्षे उलटली तरीही पुलाचे काम पूर्ण होत नसल्याचे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प पूर्ततेसाठी दीड वर्ष लागणार आहे, असे ‘एमएमआरडीए’च्या एका अधिका-याने सांगितले.

डोंबिवलीतील अनेक प्रवासी या पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षा रक्षकांनी लावलेले अडथळे दूर करून पुलावरून वाहने घेऊन जातात, अशी माहिती डोंबिवलीतील कार्तिक कृष्णन् यांनी दिली. गतवर्षी एप्रिलमध्ये मोटागाव-माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला होता.
मोटागाव येथे पुलाचा पोहोच रस्ता उतरल्यानंतर डाव्या बाजूला वळण घेऊन पोहोच रस्ता कल्याणहून टिटवाळाकडे जाणा-या बाह्यवळण रस्त्याला जोडण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे 568 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भूसंपादन पालिकेकडून होत नसल्यामुळे एमएमआरडीए या रस्ते कामाला प्रारंभ करत नाही. याकरीता तांत्रिक कामे माणकोली पुलाच्या पूर्ततेच्या आड येत आहेत, असे समजते.

भिवंडीकडील दीड ते दोन किलोमीटरचा मुंबई ते नाशिक-आग्रा महामार्गाला जोडणारा रस्ता बांधून तयार आहे आणि पुलाच्या डोंबिवली बाजूकडील पुलाचा उतार ते पोहोच रस्ता व रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची कामे प्रलंबित आहेत, असे स्थानिक प्रवाशांचे म्हणणे आहे. ही कामे जलद गतीने करावी अशी प्रवाशांची सातत्याने मागणी आहे.

ठाणे ते डोंबिवली ते अंतर 25 मिनिटांत आणि मुंबईपर्यंतचे अंतर एका तासामध्ये पार करण्यासाठी उपयुक्त असलेला उल्हास खाडीवरील मोटागाव हद्दीतील माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. त्याचे उद्घाटन करण्यात येत नसल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.