ठाणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, एससीईआरटीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर आक्षेप व सूचनाही मागवण्यात आल्या. या मु्द्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि त्यांनी अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला कडाडून विरोध दर्शवला. २९ तारखेला ( आज ) महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आव्हान आव्हाड यांनी केलं होतं.
ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, तीच मनुस्मृती हे सरकार पुन्हा आणायचा प्रयत्न करत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला पाहिजे, अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा जाऊन आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले.
ठाण्यासह राज्यभर आव्हाडांवर हल्लाबोल
मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडण्यात आले. त्यानंतर, विरोधकांनी आव्हाड यांच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या असून आव्हाड यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आव्हाड यांच्या कृतीचा निषेध करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीनेही त्यांच्या या घटनेवर भाष्य करत संतप्त प्रतिक्रिया दिली. ठाण्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले.
आव्हाडांनी मागितली माफी
मनुस्मृती दहन करण्याकरिता आम्ही महाड येथे आलो, तेव्हा मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडत असताना, त्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षातच आलं नाही. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले, यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू यात नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दामहून केले नाही. आमच्या विरोधकांना काय राजकारण करायचं आहे, ते करतील ते खूप काही मागणी करतील. पण, त्यावर मी अधिक काही बोलणार नाही, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिले आहे.