उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरण
ठाणे: उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील कार्यक्रमावेळी राडा घालणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ४४ कार्यकर्त्यांवर जामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव प्रमुख आरोपी आहेत.
शनिवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले होते. तसेच ठाकरे यांच्या ताफ्यातील काही गाड्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून मारले होते. यामध्ये गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेला 12 तास उलटल्यानंतर आता ठाणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी मनसैनिकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी आहेत. पोलिसांनी दोन वेगवेगळे एफआयआर दाखल केले आहेत. ज्यामध्ये 44 जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांमध्ये 32 महिलांसोबत 12 पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हे सर्व गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे मनसैनिकांवर गंभीर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.
उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र, आता गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस पुन्हा या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकास्त्र सोडले होते. तर आता हा वाद इथेच थांबवायचा की आणखी वाढवायचा हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असून त्यांना हवे असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात मनसैनिक त्यांची जागोजागी वाट पाहत आहेत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.