बद्रीनाथ मंदिराजवळ भीषण दुर्घटना
बद्रीनाथ धाम: उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तराखंडच्या काही भागांत सुरू असलेल्या बर्फवृष्टीदरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी सांगितले की, “चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथजवळील माना येथे हिमस्खलन झाल्यामुळे ५७ कामगार गाडले गेले आहेत. त्यापैकी १६ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”हे सर्व कामगार बीआरओशी करार केलेल्या कंत्राटदाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे. चमोलीच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ हा अपघात झाला.
आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो”, असे मुख्यमंत्री धामी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले.
पोलीस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद यांनी दुजोरा दिला की, हिमस्खलनात अडकलेल्या ५७ कामगारांपैकी १० जणांना वाचवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मानाजवळील लष्करी छावणीत दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर बचाव कार्यात तीन ते चार रुग्णवाहिका देखील सहभागी झाल्या आहेत. बचाव पथके हिमस्खलनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहचण्यात अडथळे येत आहेत. चमोलीचे संदीप तिवारी म्हणाले की, “मुसळधार बर्फवृष्टीमुळे तिथे हेलिकॉप्टर सेवा वापरता येत नाही. संवाद साधण्यासाठी सॅटेलाइट फोन किंवा इतर उपकरणेही नाहीत.”