प्रभाग पुनर्रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप

काँग्रेसचा शिवसेनेवर आरोप

ठाणे : ठाणे महापालिकेने घोळ करून प्रभागातील रचना बदलल्या असल्यामुळे प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभाग रचनेचे निकष न पाळता हे नकाशे बनविले आहेत. या विरोधात सूचना करण्यात आल्या असून वेळ पडल्यास कोर्टात देखील जाण्याची तयारी असल्याची माहिती शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे महानगरपालिकेकडून जाहिर झालेल्या प्रभाग रचनेबाबत विविध पक्षांनी आरोप केले असताना आज शहर काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन या रचनेवर आक्षेप घेतला. यावेळी शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, प्रदेश सदस्य राम भोसले, शहर काँग्रेस उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, प्रवक्ते गिरीश कोळी व मंजूर खत्री आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की, ठाणे महानगरपालिका निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडायच्या असतील तर याकरिता आयएएससारख्या अनुभवी अधिका-याची नेमणूक करण्यात यावी व त्यांच्या अधिपत्याखाली या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी केली. सद्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची तयारी चालू आहे, त्या प्रभाग रचनेतील फेरफारवरूनच या निवडणूका किती पारदर्शक होतील याबाबत शंका आहे. मशीन टेंपरिंग, मतदार यादीत फेरफार असे प्रकार होण्याची शक्यता व्यक्त केली. प्रभागाची रचना पाहिली तर काही प्रभागात एससी व एसटी राखीव जागांचा एखाद्याला फटका बसणार नाही याची काळजी घेऊनच काही प्रभाग रचनेत बदल करण्यात आले असल्याचे लक्षात येत आहे. या सर्व प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांकडून हस्तक्षेप करण्यात आला असल्याचा आरोप करीत कोणत्याही परिस्थितीत आपलीच सत्ता आली पाहिजे हा एकमेव उद्देश समोर ठेवून या रचना करण्यात आल्या आहेत. म्हणूनच आम्ही या निवडणुका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात पार पाडाव्यात अशी मागणी करीत असल्याचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

महाविकास आघाडीबाबत बोलताना सन्मानजनक न्याय मिळाला तर नक्कीच विचार करू, आतापर्यंत काँग्रेसची जवळपास 32 प्रभागात तयारी झाली असून महाविकास आघाडीमधील सर्व घटकांनी एकमेकांचे पदाधिकारी पळवू नयेत, असे आवाहन विक्रांत चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना केले.