औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई: जे काम मोदीजींनी केले ते काँग्रेसने साठ वर्षात केले नाही. आम्ही विकासावर ही निवडणूक लढवत आहे. अटल सेतु, मुंबईतील मेट्रो ही कामे मोदींनी केली. लोकांच्या मनातील आलेल्या सरकारमुळे कामे मार्गी लागली आहेत. आमचे सरकार येण्याआधी यांच्या ईगोमुळे कामे अडकली होती. लोकांच्या कामासाठी यांनी ईगो बाजूला ठेवायला पाहिजे होता, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना राज्याच्या विकासाचे व्हिजनही मांडले. ‘हे मुंबईकर, मुंबईकर म्हणतात पण मुंबईकरांसाठी यांनी काही केले का? मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर परत मुंबईत आणणे हेच आमचे व्हिजन आहे, डेव्हलपमेंट हाच आमचा मुद्दा आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीचा अजेंडा हा विकासाचा आहे. माझ एक प्रामाणित मत आहे, जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसने अपशब्द वापरले होते, तेव्हा हिंदूत्व हिंदूत्व म्हणणारे शांत बसले होते. त्यांना सावरकर नको आहेत, त्यांना औरंगजेब चालतो हे दुर्देव महाराष्ट्राचे आहे. म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काँग्रेसची भाषा बोलू लागलात, काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहे? धनुष्यबाण कोणाकडे आहे? असंही सीएम एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीमध्ये जागावाटपात कटुता नव्हती. आम्ही एका मतदारसंघात दोन-दोन उमेदवार उभे केले नाहीत. आमची विचारधारा एक आहे, आमचे लक्ष्य एक आहे. मोदी सरकार आणणे हाच आमचा अजेंडा आहे, असेही ते म्हणाले.