ठाण्यात आकर्षक बस स्टॉप व विश्रांती कट्टे तयार होणार; आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना

राज्य सरकारकडून २ कोटी निधी मंजूर

मार्च महिन्यात सुरु होणार काम

भाईंदर – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी आकर्षक बस स्टॉप व ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी विश्रांती कट्टे उभारण्यासाठी राज्य सरकारकडून चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात दोन कोटी ठाणे शहरासाठी तर उर्वरित दोन  कोटी मीरा भाईंदर मनपा क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच हे बस स्टॉप व विश्रांती कट्टे उभारण्याचे काम सुरु होणार असून वैविध्यपूर्ण व विविध आकारात , लक्षवेधी असे हे बस स्टॉप शहराच्या सौंदर्यात भर टाकणार आहेत.

बस पकडण्यासाठी प्रवासी ज्या ठिकाणी उभे राहतात ते बस स्टॉप सुस्थितीत , आकर्षक असावे तसेच त्या- त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी विश्रांती कट्टे चांगले तयार केले जावेत, त्यांना बसण्यासाठी हक्काची जागा असावी , तेथे बसल्यास लोकांना प्रसन्न वाटावे यासाठी बस स्टॉप व विश्रांती कट्टे तयार करण्यासाठी आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडे निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने या कामांसाठी नुकताच निधी मंजूर केला आहे. मीरा भाईंदर शहरासाठी दोन  कोटी व ठाणे शहरासाठी दोन कोटी असा हा निधी मंजूर झाला आहे. बस स्टॉप व विश्रांती कट्टे कुठे उभारायचे याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यात त्याचे काम सुरु होईल. बस, रिक्षा, मेट्रो याच्या प्रतिकृतीमध्ये तसेच विविध डिझाईनमध्ये बस स्टॉप असतील.  ठाणे शहरात २०, मीरा भाईंदर शहरात २० बस स्टॉप उभारले जाणार आहेत, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

अनेकदा आमदार निधीतून जी कामे केली जातात त्याची पुढच्या काळात देखभाल-दुरुस्ती महापालिकेकडून वेळेत होत नाही. त्यामुळे हे बस स्टॉप व विश्रांती कट्टे उभारल्यानंतर त्यांची वेळोवेळी निगा राखली जावी यासाठी त्या बस स्टॉपवर जाहिरात करण्याचा अधिकार एखाद्या संस्थेला देऊन त्यांच्याकडून त्याची देखभाल व निगा राखली  जाणार आहे, असे ते म्हणाले.  मीरा भाईंदर शहरात आमदार सरनाईक यांच्या संकल्पनेतून अनेक वैविध्यपूर्ण व लक्षवेधी अशी कामे आधी झाली आहेत. आता आकर्षक बसस्टॉप व विश्रांती कट्टे यामुळे शहरात आणखी विशेष कामांची भर पडणार असून हे बसस्टॉप, विश्रांती कट्टे नागरिकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील अशा पद्धतीने त्याचे डिझाईन तयार केले गेले आहे.

ठाण्यात बस स्टॉप साठी ‘या’ जागा प्रस्तावित

ठाण्यातील वर्तकनगर, आकृती हब टाऊन, आशर मेट्रो, शास्त्री नगर नाका, ब्राम्हण स्कुल, बैठी कॉलनी, भीम नगर, चिराग नगर आणि हरदास नगर, शिव समर्थ मित्र मंडळ नाका, सहयोग व्यायाम शाळा, विवियाना मॉल जवळ, ओसवाल पार्क, येऊर परिसर, पवार नगर बस स्टॉप, वसंत विहार स्कुल, टिकुजिनीवाडी प्रवेश द्वार, पोखरण रोड, घोडबंदर परिसर, कासारवडवली पोलीस स्टेशन जव , गायमुख चौपाटी अशा काही जागा बस स्टॉप तयार करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.