ठाणे : घोडबंदर पट्ट्यात सुमारे ७० वर्षांपासून वडिलोपार्जित शेती करणार्या स्थानिक शेतकर्यांना जमिनीपासून बेदखल करण्याचा दंडेल प्रयत्न एका ट्रस्टने सुरु केला आहे. या ठिकाणी १०० ते १५० भाडोत्री गुंडांना बोलावून शेतकर्यांवर बेकायदेशीररित्या दहशत व दडपशाही केली जात असल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्रांनी केला असून पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांनी यात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
घोडबंदर पट्ट्यातील ओवळा, पानखंडा, मोघरपाडा भाईंदरपाडा आदी भागात संबंधित ट्रस्टची पाच हजार एकर जमीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतजमिनींवर भातशेती करुन स्थानिक भूमिपुत्र आपली उपजिविका करीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून माखेजा कुटुंबियांकडून या जमिनीवर भाडोत्री गुंडांना उभे करुन शेतकर्यांना शेतामध्ये व जमिनीवर जाण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. आज शेकडो महिला व शेतकर्यांनी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला.
यातील काही एकर जमिनीवर ट्रस्टचा सावकारी बोजा आहे. त्यामुळेच शेतकरी कसत असतानाही शेतजमिनीचा जबरदस्तीने ताबा घेऊन लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. अगदी येथील मंदिरात जाण्यापासूनही गावकर्यांना मज्जाव केला जात आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शेतकर्यांची ट्रस्टच्या दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी येथील शिवसेनेचे रवि घरत यांनी केली आहे.