ठाण्यातही युथ कॉंग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न

आंदोलनापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांची ठाणे पोलिसांकडून धरपकड

ठाणे : ईडीने राहूल गांधी यांची चौकशी सुरु केल्याने त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. ठाण्यातही आंदोलनाआधीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ठाण्यात जिल्हा युथ कॉंग्रसेच्या वतीने गुरुवारी या विरोधात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांना याची खबर लागताच, या पदाधिकाऱ्यांना कार्यालयातूनच धरपकड करण्यात आली. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन होऊ शकले नाही. परंतु जिल्हा युथ कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आशिष गिरी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

राहूल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलीसांनी दिल्लीतील मुख्यालयात घुसुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. ठाण्यात गुरुवारी जिल्हा युथ कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात येणार होते. त्यानुसार कॉंग्रेसच्या ठाण्यातील कार्यालयात कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहनही करणार होते. परंतु याची माहिती पोलिसांना होताच, त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून सुमारे आठ पदाधिकाऱ्यांची धरपकड केली असल्याचा आरोपही गिरी यांनी केला.