आ. प्रताप सरनाईक यांची कारवाईची मागणी
भाईंदर : अयोध्येतील प्रभू श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मीरारोड नयानगर परिसरात रामभक्तांच्या रॅलीमधील वाहनांना अडवून वाहनातील रामभक्तांना मारहाण करीत वाहनांची तोडफोड करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन हल्लेखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी केली. पोलिसांनी सदर प्रकरणी १३ हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.
मीरारोड नयानगर परिसरातील आझादनगरमध्ये रविवारी रात्री १०-३० च्या सुमारास रामभक्तांच्या रॅलीतील भगवे ध्वज लावलेल्या वाहनांचा ताफा आला असता अचानक काही तरुणांचा जमाव रस्त्यावर आला. त्यांनी ही वाहने थांबवून वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वाहनातील रामभक्तांनी वाहनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीची खबर मिरारोड नयानगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस पोहोचल्यावर ही जमावाने रामभक्तांवर हल्लाबोल करीत त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
पोलिसांची कुमक येताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी रामभक्तांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांना भाईंदर पश्चिमेला भारतरत्न पंडित डॉ. भीमसेन जोशी इस्पितळात दाखल केले आहे. जखमींमध्ये महिलेचा समावेश आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आयुक्तालयात भेट घेऊन प्रसंगी कोंबिंग ऑपरेशन करुन रामभक्तांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली. पोलिसांनी सुमारे १३ हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून उर्वरित हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.