तरण तलावात सराव करणारे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर शहराचा नावलौकिक करतील 

पालकमंत्री एकनाथ शिंदे  हस्ते कै. धर्मवीर आनंद दिघे तरणतलावाचे लोकार्पण 

ठाणे : कै. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने बाळकुम येथे ऑलिम्पिकच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या तरण तलावाचा या परिसरातील जलतरणपटुंना चांगलाच फायदा होणार असून हे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करून ठाणे शहराचा नावलौकिक करतील असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने प्रभाग क्रमांक ८ मध्ये महापालिका निधीतून बाळकुम येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ‘कै.धर्मवीर आनंद दिघे ‘ तरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

या लोकार्पण सोहळ्यास खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, परिवहन समिती सभापती विलास जोशी, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रियांका पाटील, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती सभापती तथा स्थानिक नगरसेविका निशा पाटील, माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक नरेश मणेरा, स्थानिक नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त(१)संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपआयुक्त मनीष, उपआयुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे, यांच्यासह जलतरणपटू, प्रशिक्षक व स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.

महापालिकेने खेळांसाठी दिलेल्या उत्तम सुविधांमुळे आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळात ठाण्यातील खेळाडू चमकत आहेत. आज महापालिकेच्या ६ व्या “कै.धर्मवीर आनंद दिघे” तरण तलावाचा लोकार्पण सोहळा होत आहे. बाळकुम, घोडबंदर परिसरातील जलतरणपटुंना याचा चांगलाच फायदा होणार असून अनेक राष्ट्रीय स्पर्धेत या शहरातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून ठाणे शहराचा नावलौकिक करतील असे पालकमंत्री म्हणाले.  धर्मवीर आनंद दिघे यांचे बाळकुम परिसरावर विशेष प्रेम होते. आज ऑलिम्पिकच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या तलावाला कै. धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर तसेच सर्व पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाने विशेष आभार मानले. ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहराने पर्यावरणाचा समतोल राखला असून महापालिकेने अनेक क्रीडांगणे, मैदाने तसेच स्टेडियम निर्माण केल्याने आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असणाऱ्या या शहरात राहण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती असल्याचेही पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
कै.धर्मवीर आनंद दिघे आणि आमचे कौटुंबिक नाते होते.  बाळकुम मधील या तरण तलावाला धर्मवीर कै.आनंद दिघे हे नाव देण्यात आले असून बाळकुमसाठी ही भाग्याची गोष्ट आहे. ऑलिम्पिकच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या तरण तलावात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील असा विश्वास स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनीही व्यक्त केला.

शहरात विकास कामांसोबत खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका आहे. महापालिकेने तयार केलेल्या क्रीडांगण, स्टेडियम, क्रीडा संकुल व मैदानात अनेक खेळाडू सराव करत असून अर्जुन पुरस्कार, श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार यासोबत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठाण्यातील खेळाडूंनी आत्तापर्यंत पटकाविले आहेत. “कै.धर्मवीर आनंद दिघे” तरण तलावाचा फायदा ठाण्यातील अनेक जलतरणपटुंना सरावासाठी होणार असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी या लोकार्पण सोहळ्यानिमित्त व्यक्त केले.

हा तरणतलाव ५० मी. X २५ मी. आकाराचा ऑलिम्पिक साईजचा तयार करण्यात आला आहे. यामध्ये खोली ५ फुट ते ६ फुट ७ इंच, व्हिविंग गॅलरी व तळ अधिक ३ मजल्याची युटिलिटी इमारत बांधण्यात आली आहे. तळ मजल्यावर प्रशासकीय कार्यालय, रिसेप्शन एरिया, स्नॅक्स बार, स्टोअर रूम, रेस्ट रुम्स, लॉकर रुम, चेंजींग कम शॉवर रुम्स, पंप रुम, पहिल्या मजल्यावर स्त्री व पुरुषांसाठी व्यायामशाळा व रेस्ट रुम्स, स्टोअर रूम, दुसऱ्या मजल्यावर इनडोअर गेम्स व रेस्ट रुम्स तर तिसऱ्या मजल्यावर कॅफेटेरीया व रेस्ट रुम्स बांधण्यात आल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यातील कामे पूर्ण करण्यात आली असून तिसऱ्या टप्प्यात उर्वरीत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.