अंबरनाथ: इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे अखेर अंबरनाथमधील रस्त्यांच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात रस्ता स्वच्छतेसाठी चार इलेक्ट्रॉनिक यंत्रे खरेदी करण्यात आली होती.
स्वच्छ भारत अभियान आणि पंधराव्या वित्त आयोगातून माझी वसुंधरा योजनेमधून यंत्रे खरेदी करण्यात आली होती. हवेचा दर्जा उत्तमरित्या राखला जावा यासाठीच्या शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नगरपालिकेच्या माध्यमातून बॅटरीवर चालणाऱ्या यंत्राद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांच्या सफाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शासनाकडे अनुदानातून मागील वर्षी शासनाच्या अधिकृत वेबसाइटवरून चार इलेक्ट्रॉनिक रोड स्वीपिंग यंत्रे खरेदी केली होती. पूर्णतः बॅटरी चार्जिंगवर चालणाऱ्या यंत्रामुळे वायूप्रदूषणाची समस्या जाणवणार नाही. हवेच्या दाबामुळे रस्त्यावरील कचरा पाइपद्वारे खेचून घेतला जातो.
सध्या पूर्वेला दोन आणि पश्चिम दिशेला दोन अशा चार यंत्रांद्वारे कचरा उचलण्याच्या कामाला आज मंगळवार ३१ ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे.
उल्हासनगरच्या साईबाबा मंदिरापासून अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यापर्यंत अंदाजे सहा किमी अंतर असून यंत्राद्वारे रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आरोग्याधिकारी संदीप कांबळे, निरीक्षक सुहास सावंत यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शनानुसार कचरा उचलणारी चार इलेक्ट्रॉनिक यंत्रे मागील वर्षी आणण्यात आली. पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर यंत्राद्वारे रस्ता स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.