दोन लाखांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरिक्षक अटकेत

भिवंडी: भिवंडी येथील नारपोली पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलिस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार २५ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या १६ वर्षांचा योगेश शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे ७ डिसेंबर रोजी उघड झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश झा, मनोज टोपे, अनिकेत खरात, शिवाजी माने, संतोष ताटीपामुल या आरोपींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करीत होते.

आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी तर  कुटुंबीयांना या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत शरद पवार याने अनिकेतच्या आईकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने दोन लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर महिलेने त्याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत शरद पवार यांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.