कल्याण : रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलटने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याण कोळसेवाडी परिसरात घडली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सुजितकुमार जयंत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सुजित यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. संतापलेल्या सहकाऱ्यांनी रविवारी कल्याण लोको पायलट कार्यालय बाहेर गोंधळ घालत वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजित कुमार जयंत (३०) वर्षे असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक लोको पायलटचे नाव आहे. कल्याणमध्ये कोळसेवाडी परिसरात एकटाच राहत होता. त्याचे कुटुंब गावाला होते. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सुजित यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सुजित यांच्या सहकार्यानी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वरिष्ठांनी परिक्षेच्या कारणावरून जाच केला होता. तशातच पगार न मिळाल्याने आर्थिक तंगीमुळे वरिष्ठांच्या जाचामुळे सुजित त्रस्त असल्याचा आरोप सुजित यांच्या सहकाऱ्यांनी केला.
संतापलेल्या सहकाऱ्यांनी रविवारी कल्याण लोको पायलट कार्यालय बाहेर गोंधळ घालत वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी कल्याण रेल्वे लोको पायलट कार्यालयाबाहेर आरपीएफ व शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.