भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

भाईंदर : भाईंदरमध्ये भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना खान यांच्यावर रविवारी रात्री भाईंदरमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

नया नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना समीर खान या आपल्या कारमधून दीपक रुग्णालयाच्या दिशेने जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारच्या खिडकीच्या काचा फुटल्याने त्या जखमी झाल्या आहेत. हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रविवारी रात्री ११ च्या सुमारास सुल्ताना शेख आपल्या पती सोबत डॉ.अहमद राणा या मित्राकडे जात होते. नया नगरमधील मागच्या रोडवर चारचाकी वाहन चालवताना ११.१५च्या सुमारास दोन मोटारसायकलस्वार गाडीजवळ येऊन शिवीगाळ आणि हातात असलेल्या हत्याराने सुल्ताना ज्या ठिकाणी बसल्या होत्या तिथली काच तोडून त्याच्यावर हल्ला केला. यावेळी “हे टोकन आहे शांत रहा नाही तर खानदानाला देखील संपवून टाकू”अशी धमकी देऊन पळ काढला. सोबत असलेल्या पतीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि सुल्ताना यांना इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सुल्ताना शेख या अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या महिला अध्यक्ष आहेत. सुल्ताना यांनी ४ जुलै रोजी कोणाचे नाव न घेता फेसबुकवर सांगितले की, जर आपल्यात हिम्मत असेल तर समोर येऊन बोला ‘डी कंपनी’च्या धमक्या देऊ नका. माझ्या जीवाला धोका आहे असे देखील त्या म्हणाल्या आणि फेसबुकवर टाकलेल्या व्हिडीओनंतर १३ दिवसांनी त्यांच्यावर हल्ला झाला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नया नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.