आशिष दामले यांना राष्ट्रवादीत लवकरच मोठे पद मिळणार

बदलापुरात दादाज क्लिनिकचे उदघाटन

बदलापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत असणारे बदलापुरातील सामान्यांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी येणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी बदलापुरात केले.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने श्री. दामले यांनी दादाज क्लिनिक, आयुष्यमान आरोग्यमंदिर बदलापुरात सुरु केले. त्याच्या उदघाटनाप्रसंगी मंत्री बनसोडे यांनी दामले यांच्या सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतूक करून भविष्यात दामले यांना मोठे पद मिळणार असल्याचे सूतोवाच केले.

दादाज क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांवर विनाशुल्क उपचार केले जाणार आहेत. विविध उपक्रम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील शहराध्यक्ष दामले यांनी घेतली असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले. दामले यांनी सुरु केलेल्या क्लिनिकला उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन रुग्णवाहिकांची भेट दिली आहे.

बदलापूरमध्ये गरजूंसाठी अल्पदरात भोजन, वाचनालय, अभ्यासिका, आदी उपक्रम सुरु केले आहेत , त्याचा असंख्य नागरिकांना फायदा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाल्याचे समाधान वाटते, असे शहराध्यक्ष दामले म्हणाले. उपक्रम राबवण्यापूर्वी त्याचे पूणपणे नियोजन केले जाते त्यामुळे उपक्रम यशस्वी होतो असेही शहराध्यक्ष दामले म्हणाले.

बदलापूर शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, डॉ. सुधीर साने, डॉ. प्रमोद पारितेकर, डॉ. शकुंतला चुरी, डॉ. जॉयदीप चॅटर्जी आदी यावेळी उपस्थित होते.