शहापूर तालुक्यात वनविभागाच्या अडचणी आदिवासींच्या मुळावर
शहापूर: शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातील तळवडे गावात सहा वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या वीजपुरवठा योजनेला वनविभागाने जागा न दिल्याने ही योजना गेल्या सहा वर्षांपासून रखडली आहे. या योजनेचे विद्युत पोल व इतर साहित्य आजही दहिगाव जवळ पडून असल्याची बाब आदिवासी युवकांनी निदर्शनास आणून दिल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईस्थित एका संस्थेने येथील गैरसोय लक्षात घेऊन येथील आदिवासी पाड्यात सौरऊर्जा प्रकल्प बसवून आदिवासी पाडे प्रकाशमय केले होते, परंतु या सौरऊर्जा प्रकल्पाच्या बॅटऱ्या कालबाह्य झाल्याने आणि यासाठी आदिवासी रहिवाशांकडे आर्थिक सोयी नसल्याने सौरऊर्जा प्रकल्प बंद पडला असून येथे पूर्ण अंधार पसरला आहे. यासाठी शासनाने येथील वनविभागाच्या जमिनीची अडचण सोडवून येथे नवीन वीजपुरवठा योजना मंजूर करून येथील आदिवासींच्या जीवनात उजेड आणावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहापूर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तळवडा या आदिवासी पाड्यासहित मनाचा आंबा, तुंबडेपाडा, कंडोलपाडा, पोई आणि शिसवली असे 150च्या आसपास असलेले पाच पाडे असून 1400च्या आसपास लोकसंख्या आहे. येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून विजेची सोय नाही. येथील आदिवासी पाड्यात वीज यावी यासाठी तत्कालीन सरकारने 2016-17 ला वीज पुरवठा योजना मंजूर केली होती. योजनेचे आमदार दरोडा यांनी उदघाटनही केले होते. यासाठी ठेकेदाराने पोल, वायर आणि इतर साहित्याची खरेदी करून साहित्यही आणून दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ठेवले होते, परंतु दहिगाव ते तळवडा येथे जाणाऱ्या वीज वाहक तारा व पोल टाकण्यासाठी वन्यजीव वनविभागाने हरकत घेतल्याने गेल्या 6/7 वर्षांपासून हे कामच बंद असल्याने येथील योजना महावितरण ने रद्द केली असल्याचे समजले. त्यामुळे येथील पाडे आजही अंधारात आहेत त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना अडचण येत असून येथील रहिवाशांच्या विकासाची वाटच बंद झाली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करीत असून संस्थेने लावलेले सौरऊर्जा वरील वीजजोडणीच्या बॅटऱ्या सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधिंनी निधी उपलब्ध करून येथील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.
सहा वर्षांपूर्वी येथील वीजपुरवठा योजना मंजूर होऊन विद्युत तारा टाकण्यासाठी पोलही आणून पडले होते, परंतु वनविभागाने तांत्रिक अडचण निर्माण केल्याने आम्हाला अंधारात जीव धोक्यात घालून जीवन जगावे लागत आहे. आमच्या पाड्यातील आणि आमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी वीजपुरवठा लवकरात लवकर करावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिक रहिवासी भाऊ तुंबडे आणि गुरुनाथ मोकाशी यांनी दिला आहे.
वनविभागाचा 3/2 प्रस्ताव न आल्याने या योजनेत अडचण निर्माण झाली असून प्रस्ताव आल्यास नवीन आराखडा बनवून मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती महावितरण खर्डीचे सहायक अभियंता सुरेश राठोड यांनी दिली.
तळवडे येथील वीजपुरवठा वन्यजीव जागेतून होणार असल्याने 3/2 चा नवीन प्रस्ताव सादर केल्यास वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती वन्यजीव विभाग, खर्डीचे वनपाल एकनाथ रेंगडे यांनी दिली.