अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीत आंदोलन
अंबरनाथ : मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळलेल्या एका गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवाशांनी ‘नो वॉटर नो वोट’ फलक झळकवताच सोसायटीचा अनियमित पाणीपुरवठा सुरळीत झाला.
अंबरनाथच्या कानसई भागात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी दाबाने येत होता. याबाबत वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याशी संपर्क साधून देखील अनियमित पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली नाही.
येथील स्वामी देवप्रकाश उच्चभ्रू सोसायटीला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. अखेर सोसायटीच्या सभासदांनी एकत्र येऊन, ‘नो वॉटर नो वोट’ चे फलक सोसायटीच्या आवारात लावून आंदोलन छेडल्याने, त्याची तत्काळ दखल घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईचा प्रश्न काही तासात मार्गी लावला. सोसायटीला पाणी मिळाल्याने येथील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
स्वामी देवप्रकाश सोसायटीमध्ये साधारण 500 सभासद राहतात. या सोसायटीमध्ये मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने व तक्रारी करून देखील संबंधीत विभाग याची दखल घेत नसल्याने अखेर या सोसायटीच्या सभासदांनी ऐन कल्याण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, नो वॉटर नो व्होट चा नारा देत आंदोलन छेडले. या आंदोलनाने स्थानिक राजकीय नेते व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खडबडून जागे झाले व तत्काळ समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी सोसायटीमध्ये दाखल झाले. जलवाहिनी दुरुस्त करून त्यातील कचऱ्याचा अडथळा दूर करून पाणी सुरळीत सुरू केले.