आयुक्तांच्या दौऱ्याची खबर मिळताच नालेसफाईला सुरुवात; आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

ठाणे: वागळे इस्टेटमधील नाल्यांची सफाई आयुक्तांचा दौरा होणार असल्यानेच सुरु करण्यात आली. यापूर्वी या नाल्याची सफाई झालीच नसल्याची तक्रार शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केल्यानंतर आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

बुधवारी आयुक्तांनी पाचपाखाडी ते वागळे इस्टेट आदी भागातील नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या ही बाब निर्दशनास आली. हनुमान नगर भागातील या मुख्य नाल्यात पावसाळ्यात डोंगरातील पाणी येत असते. परंतु या नाल्याची सफाई होत नसल्याने पावासाच्या पाण्यासह नाल्यातील गाळ हा रस्त्यावर येतो. तसेच हा नाला पुढे शहराकडे जात नसल्याने या नाल्याची सफाई योग्य न झाल्यास त्याचे परिणाम पावसाळ्यात भोगावे लागण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यातही मागील कित्येक वर्षे या नाल्याची सफाई झाली नसल्याचा मुद्दा यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी उपस्थित केला. आयुक्त पाहणी दौऱ्याला येणार म्हणून नाले सफाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावरुन आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नालेसफाई योग्य रितीने न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

यावेळी त्यांनी कै.महादेव पाटील चौक, पाचपाखाडी येथील नाला व रुणवाल सर्व्हिस रोड येथील नाल्याची पाहणी केली. ज्ञानसाधना कॉलेज, धर्मवीरनगर, सुपरमॅक्स कंपनी, ब्राडमा कंपनी तसेच वागळे बस डेपो येथील नाले साफसफाई कामाची पाहणी केली. या सर्व नाल्याची खोली वाढविणे, नाल्याच्या बाजूची पडलेल्या भिंती बांधणे, नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, प्रवाहातील अडथळे दुर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. दरम्यान चिखलवाडी येथे मुसळधार पावसात नेहमीच पाणी साचते त्या ठिकाणी जून महिन्यातच सबमर्सियल पंप लावण्याचे निर्देश देतानाच इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वागळे प्रभाग समितीमधील पडवळनगर येथील नालेसफाईची पाहणी करून त्या ठिकाणी कल्व्हर्टचे काम तातडीने पूर्ण करणे तसेच या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत केबल्स तात्काळ काढण्याचे आदेश त्यांनी संबधितांना दिले.

५० टक्के नालेसफाईचा दावा
यावर्षी वेळेआधीच नालेसफाईच्या कामाला शहरात एकाच वेळी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाई वेळेआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बुधवारी महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी संपूर्ण शहरातील नालेसफाईचा आढावा घेतला. यावेळी आतापर्यंत ४० ते ५० टक्के नालेसफाई झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.