आजपासून श्रीरंग विद्यालयात ऊर्जा विज्ञान प्रदर्शन
ठाणे: श्रीरंग शिक्षण संस्थेचे श्रीरंग विद्यालय हे दरवर्षी प्रमाणे ऊर्जा २०२४ हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे यंदा जैव विविधता हा विषय घेण्यात आला आहे. प्रदर्शनात ६० च्या वर शाळा सहभागी झाल्या आहेत. हे प्रदर्शन १,२,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केले आहे.
यात विज्ञान प्रदर्शन व्यतिरिक्त अनेक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २ फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमि दिवस म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त
पाणथळभूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलची प्रदर्शनी तसेच टेरेस्ट्रियल बर्ड अशा दुर्मिळ पक्षांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या सहाय्याने मांडण्यात आले आहे. त्याचे उदघाटन ग्रिल हॉल, श्रीरंग विद्यालय येथे गुरुवार, १ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित वन्यजीव फोटोग्राफर रुता कलमंकर यांच्या हस्ते होणार आहे.
शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पहिला मजला ऑडिटोरियममध्ये मुख्य विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन मराठी विज्ञान परिषदचे अध्यक्ष श्री. दा. कृ. सोमण यांच्या हस्ते होणार आहे.
रविवार, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मुंबई विद्यापीठाच्या जैविक विज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे, अशी माहिती सचिव प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
यावर्षी ऊर्जा कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनाही कलाविष्काराची संधी देण्यात येणार आहे. नृत्य, एकांकिका, कथाकथन, शायरी, मोनोअँक्ट, गायन (कॅराओके), आणि प्रेरणादायी जीवन कथा सांगणे यासारखे विविध कार्यक्रम सादर करता येणार आहेत. विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. याशिवाय, विविध पारंपरिक खेळ आणि सेल्फी पॉइंट्ससह लाइव स्टेज परफॉर्मन्सेस असतील. अधिक माहिती आणि प्रवेश अर्जांसाठी नीलम शेलार – ८४२२८४८५९४ आणि सुपर्णा घोष यांना ९९८७७०६६८४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.