पोलीस असल्याची बतावणी करून पैसे मागणाऱ्या भामट्याला अटक

उल्हासनगर : पोलीस असल्याची बतावणी करून एका पान शॉप चालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्या एका भामट्याला मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

उल्हासनगर कॅम्प 3 येथील शांतीनगर परिसरात राकेश झा या इसमाचे अभिषेक पान शॉप नावाचे दुकान आहे. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिलीप शांताराम पाटील हा इसम पान शॉपमध्ये आला. त्यावेळी त्याने झा यांना आपण पोलीस असल्याचे सांगून, तू गुटखा विकतोस, त्यामुळे तुला पाचशे रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. राकेश झा यांना त्याचा संशय आल्याने त्याने तत्काळ याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कळवले.

या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळताच त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी दिलीप पाटील याला ताब्यात घेतले. पाटील याच्या विरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.