उल्हासनगर: प्रॉपर्टीच्या वादातून सकाळच्या सुमारास मनविर मरोठीया ह्या इसमाची हत्या त्याच्या पुतण्यासह तीन जणांनी केली होती. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अवघ्या पाच तासात मुंबई येथून अटक केली.
उल्हासनगर कॅम्प 3 मधील फोलॉवर लेन परिसरातील इमली पाडा येथे मयत इसम मनवीर मरोठीया हे राहत होते. त्यांचे त्यांच्या कुटुंबात प्रॉपर्टीचे वाद अनेक दिवसांपासून सुरू होते. याच वादातून अनेकदा जोरदार भांडणही झाले. परंतु आज सकाळी याच कुटुंबातील आकाश वाल्मिकी, योगेंद्र उर्फ भोलू मरोठीया आणि गणेश ऊर्फ शालू मरोठीया यांनी राखी करोतीया हिला कामावर सोडण्यास जाणाऱ्या रामपाल करोतीया याच्यावर लाकडी दांडा आणि तलवारीच्या सहाय्याने हल्ला चढविला. ह्या हल्ल्यात रामपाल करोतीया हे जबर जखमी झाले, तर त्यांची पत्नी राखी हिच्या पायाला मारहाण झाली. त्यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेची माहिती मनवीर मरोठीया याना मिळताच त्यांनी रामपाल यांच्यावर हल्ला झालेल्या फॉलोवर लाईन चौक येथे धाव घेतली. त्यावेळी तिथे दबा धरून बसलेले आकाश वाल्मिकी, भोलू आणि शालू यांनी तलवारीने हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या मनवीरच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला.
हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी मध्यवर्ती पोलीस रवाना झाले होते. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी आकाश वाल्मिकी, योगेंद्र उर्फ भोलू मरोठीया आणि गणेश ऊर्फ शालू मरोठीया हे मुंबई येथे पळून गेल्याचे लक्षात आले. त्याच वेळी जयपूर येथून तपास संपवून बांद्रा येथे परतले होते. गुन्हे निरीक्षक सुहास आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे, पोलीस अंमलदार राजाराम कुकले, विजय जिरे, विकास जरग, पोलीस हवालदार अरविंद पवार, निलेश कांगणे, दिपक पाटील, विकास पाटील, बाळासाहेब ढाकणे यांच्या पथकाने तात्काळ विलेपार्ले गाठत आरोपींना ताब्यात घेतले. शनिवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.