आरोग्यवर्धिनी केंद्राला ठेकेदारांची प्रतिक्षा

निविदा प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत ६८ पैकी एक आपला दवाखाना सुरु झाल्यानंतर महापालिकेने आणखी तीन ठिकाणी अशा पध्दतीने आरोग्य वर्धिनी केंद्र (आपला दवाखाना) सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्याने ठाणे पालिकेने पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ दिली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून आपला दवाखान्यांच्या धर्तीवर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात ६८ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जाणार असून पैकी १४ ठिकाणच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. परंतु आता काही ठिकाणी जागांच्या अडचणी दूर झाल्यानंतर पालिकेने टप्याटप्याने त्या-त्या भागात आपला दवाखाना सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कासारवडवली, टिकुजिनीवाडी आणि नौपाडा मध्ये पाचपाखाडी या तीन भागात अभिव्यक्ती स्वारस्य देकार महापालिकेने मागविले आहेत. त्यानुसार त्याची निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ दिली आहे. आधी जागांचा शोध त्यानंतर जागा मिळाल्यावर आता ठेकेदार मिळत नसल्याने आपला दवाखाना केव्हा सुरु होणार असा पेच पालिके समोर उभा ठाकला आहे.

ठाणे पालिका हद्दीतील दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, खिडकाळी, हाजुरी शाळा क्रमांक १२२, कोपरी जकात नाका, येऊर, बामनोई पाडा, विटावा शाळा क्रमांक ७२, पातलीपाडा आणि कोलशेत अशा १४ ठिकाणी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.