दिव्यातील प्रभाग रचनेवरून सेना-राष्ट्रवादीत पेटणार संघर्ष

शिवसेनेने मुद्दा केला प्रतिष्ठेचा

ठाणे : प्रभाग रचना करताना दिवा भागातील नगरसेवकांची संख्या कमी करण्यात आली असून पुन्हा सदस्यांची संख्या वाढविण्यासाठी शिवसेना हा मुद्दा प्रतिष्ठेचा करणार असून त्यावरून शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची नवीन प्रभाग रचना मागील आठवड्यात जाहीर करण्यात आली. ही प्रभाग रचना तयार करताना दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली असतानाही तेथिल नगरसेवकांची संख्या आठ वरून सात करण्यात आली. मुंब्रा-कळवा परिसरातील नगरसेवकांची संख्या पाचने वाढविण्यात आली आहे. या वाढीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होणार आहे तर दिवा भागातील एक जागा कमी झाल्याने शिवसेनेला त्याचा फटका बसणार आहे. शिवसेनेच्या दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर लोकमान्यनगर, घोडबंदर भागातील प्रभाग रचनेवर देखील हरकत घेण्यात आली आहे.

दिव्यातील नगरसेवकांची कमी झालेली संख्या मात्र शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांच्या जिव्हारी लागली आहे. महापालिका प्रशासनाने पूर्वी ज्याप्रमाणे दिव्यात एक नगरसेवक वाढवला होता, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा प्रभाग रचना करण्याचा मनसुबा शिवसेनेचा आहे. त्या प्रमाणे जर प्रभाग रचना तयार करण्यात आली तर राष्ट्रवादी पुन्हा एकदा त्याला हरकत घेऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन शिवसेना त्यांची रणनीती आखणार आहे, त्यामुळे संपूर्ण प्रभाग रचना बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.