ठाणे : अनियमित पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने सत्ताधारी शिवसेना पक्षाचेच नगरसेवक संतोष वडवले यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
वागळे परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर रॉकेलचा कॅन आणि आगकाड्यांची पेटी घेऊन वडवले चढले आणि त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या समोरच स्टंट केला. ठाण्यात गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षाची सत्ता असून सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नगरसेवकालाच प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात अशा प्रकारे स्टंट करावा लागत असल्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेले काही दिवस पाणी प्रश्न पेटला आहे.विशेष करून कळवा मुंब्रा परिसरात तर पाणी मिळत नसल्याने स्वतः राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे ठाणे शहरात देखील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून वागळे परिसरात शिवसेनेचे नगरसेवक संतोष वडवले यांनी सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन स्टंट केला. यावेळी नगर अभियंता अर्जुन अहिरे तसेच अन्य कार्यकारी अभियंता घटनास्थळी दाखल होऊन पाण्याची समस्या का आहे याचे स्पष्टीकरण केले.त्यानंतर हा वाद मिटला.
वडवले यांच्या या आंदोलनामुळे मात्र शिवसेना पक्षच आता अडचणीत आला आहे. याच परिसरातील काही दक्ष नागरिकांनी वडवले यांच्या या आंदोलनावर टीका केली आहे. संतोष वडवले हे तीन टर्म नगरसेवक असून पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नसून हेच सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका या परिसरातील दक्ष नागरिक संजय दळवी यांनी दिली आहे. सत्ताधारी त्यांचे काम योग्य पद्धतीने करत असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हे पाऊल उचलले असल्याचे वडवले यांनी सांगितले.