नवी मुंबई : आंबे खावे तर कोकणातलेच, त्याकरिता अनेकदा आपण देवदगडच्या आंब्यांची पेटी खरेदी करतो. पण पेटीमधला आंबा हा नक्की देवगडचाच आहे का? याची खात्री आपण कधी करत नाही. याबाबत शंका देखील उपस्थित करत नाही. याचाच फायदा घेत आंबा लवकर पिकवण्यासाठी रासायनिक फवारणी करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे बोलले जात आहे
एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या हंगामाने जोर धरला असून सध्या एक लाखपेक्षा जास्त हापूस आंबाच्या पेट्या दाखल होत आहेत. यामधे कोकणातील हापूस आंब्याच्या जवळपास ८० हजार पेट्या येत आहेत तर कर्नाटक व इतर राज्यातून जवळपास ३० हजार पेट्यांची आवक होत आहे. मात्र काही परप्रांतीय व्यापारी रात्रीच्या वेळी आंब्याची भेसळ करतात. कॅरेटमधून कर्नाटकी कच्चे आंबे गाळ्यात उतरवल्यानंतर देवगडच्या लाकडी आणि कागदी पेट्यांमध्ये इथरेलची फवारणी करून देवगड हापूसच्या नावावर आंब्याची पेटी तयार केली जाते. आणि गाळ्यांमध्ये या पेटीचा साठा केला जातो. त्यानंतर दोन दिवसांमध्ये हा हिरवागार आंबा पिवळा धम्मक होतो व लगेच याची विक्री केली जाते.
सध्या बाजार आवारात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणत होत आहे. कोकणातील हापूस आंब्याची आवक जास्त होऊन सुद्धा जास्त नफा कमवण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी कोकणातील हापूस आंब्यांच्या पेटीत कर्नाटकी आंबा भरून आंब्यांवर रासायनिक फवारणी करून ग्राहकांची जीवाशी खेळत आहेत.
इथरेलद्वारे पिकवलेला आंबा वरुन पिवळा दिसतो. वरवर पाहता हा आंबा आकर्षक दिसतो. मात्र याची चव तुरट आंबट लागते. भरघोस नफा, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे .परंतु तयार आंब्यावर केली जाणारी रासायनिक फवारणी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुबंई कृषी उत्पन्न फळ बाजारात आंब्याच्या हंगामात नेहमीच आम्ही नजर ठेवून आहोत. याच आठवड्यात आंब्याची विशेष तपासणी मोहीमही हाती घेऊन काही नमुने घेतले आहेत. आंब्यांवर रासायनिक फवारणी करण्याची परवानगी नियमात नमूद नाही. आंब्यावर इथलीन गॅस रायपिंग चेंबरमध्ये करण्याची परवानगी आहे. आंब्यावर थेट रासायनिक फवारणी होत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्य्क आयुक्त योगेश डहाणे यांनी सांगितले.