ठाणे : पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला भगदाड पडल्याने माकडांचा सुखेनैव जलविहार सुरू असतो. तेच पाणी सावरकरनगर आणि लोकमान्यनगरच्या रहिवाशांना प्यायला मिळते. गेल्या आठ महिन्यांपासून अस्वच्छ पाणी पिणाऱ्या या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सावकरनगरमधील पाण्याच्या टाकीला भगदाड पडले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सावरकरनगर आणि लोकमान्य नगरमधील रहिवासी अस्वच्छ पाणी पित आहेत. या टाकीत माकडे सुद्धा अंघोळ करतात. ठाणे शहर स्वच्छतेत टॉप टेनमध्ये येण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी कंबर कसली असताना या टाकीकडे दुर्लक्ष होत असल्याचे ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजीव शिरोडकर यांनी म्हटले आहे. ही टाकी धोकादायक अवस्थेत असून तातडीने दुरुस्त न केल्यास टाकी पडण्याची भीतीही शिरोडकर यांनी व्यक्त केली आहे.
टाकीच्या दुरुस्तीचे आश्वासन प्रशासनाने देऊनही त्यावर उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी सावरकरनगर आणि लोकमान्यनगर या परिसराला वेळेवर पाणी मिळत नाही. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही तर नागरिक आंदोलन करतील असा इशारा शिरोडकर यांनी प्रशासनाला दिला आहे.