जानाई-शिरसाई योजनेची मंजुरी माझ्याच स्वाक्षरीने

शरद पवार यांच्या दाव्यावर अजित पवार यांचे प्रत्युत्तर

बारामती : तालुक्यातील जानाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्न यावर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे चांगलाच ऐरणीवर आला आहे. या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकाच वेळी लक्ष घातल्याने त्याची आणखीनच चर्चा होत आहे.

दोन दिवसांपूर्वी बारामती भागातील शेतकरी जानाई उपसा सिंचन योजनेप्रकरणीच आधी सुप्रिया सुळे आणि नंतर शरद पवार यांना भेटले होते. त्यावेळी या योजनेसाठी स्वाक्षरी मीच केली आहे, मीच त्याला मंजुरी दिली, असा दावा शरद पवार यांनी केला. त्यानंतर याचप्रश्नी बैठक झाल्याची समजताच‌. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने सुपे येथे येत आढावा बैठक घेतली आणि यामध्ये ही सगळी कामे फक्त आपणच करू शकतो, असे ठामपणे सांगितले. या योजनेवरून सुरू झालेली श्रेयवादाची लढाई आज तर चक्क शरद पवार यांच्या स्वाक्षरीपर्यंत पोहोचली.

आज सकाळी पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला की,जानाई शिरसाई योजनेची मंजुरी माझ्याच स्वाक्षरीने झाली, असा दावा मोठ्या साहेबांनी केलाय. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता अजित पवार पत्रकाराला म्हणाले, तू मुंबईत ये, तुला फाईल दाखवतो मग कोणाची सही आहे ते कळेल…

अजित पवार यांच्या उत्तरानंतर या पुढच्या काळात जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना कोणी सुरू केली, कोणी मंजुरी दिली, यावरून अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर बारामतीच्या राजकारणाची लढाई आता काका-पुतण्यांमध्ये लढली जाईल अशाच स्वरूपाची थेट चिन्हे या निमित्ताने आज दिसून आली.

बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील नागरिकांना पिण्याचे, शेतीचे पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे; त्यासाठी जानाई -शिरसाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे ३० दिवस पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी दिली.

टप्प्याटप्प्याने जानाई-शिरसाई आणि पुरंदर योजनेला लागणारी वीज सौर उर्जेद्वारे देण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. त्यासाठी सौर पॅनल बसविण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी. सुपे येथे जागा उपलब्ध करून दिल्यास जनाई योजनेचे शाखा कार्यालय उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.