ठाणे : अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोडसाठी वाढीव खर्च, दिव्यातील क्लस्टर सर्व्हेक्षण, अण्णाभाऊ साठे स्मारक आदींसह इ-वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा प्रस्तावही आजच्या महासभेत मंजुर करण्यात आला.
शुक्रवारच्या महासभेत भाजपचा एकही नगरसेवक दिसून आला नाही. हे सर्व नगरसेवक रेल्वे मंत्र्यांच्या कार्यक्रमाला गेले असल्याने ते हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे महासभेत कधी नव्हे तो एकाही विषयाला विरोध झाल्याचे दिसून आले नाही.
महापालिकेच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून चार्जिंग स्टेशनसाठी जागेची शोध मोहीम सुरु होती. अखेर महापालिका पीपीपी तत्वावर शहरात ३० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव शुक्रवारच्या महासभेत मंजुर झाला. यावेळी महापौर म्हस्के यांनी या प्रकल्पाला विरोध न करता नगरसेवकांनी सहकार्य करुन भविष्यात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहनही केले. याशिवाय अंतर्गत मेट्रोच्या वाढीव खर्चाचा, कोस्टल रोड, दिव्यातील क्लस्टर सर्वेक्षण, अण्णाभाऊ साठे स्मारक आदींसह नामकरणाचे विषयही यावेळी मंजुर करण्यात आले.