महायुतीकडून मुख्यमंत्र्यांसह केळकर, मुल्ला यांचे अर्ज दाखल

ठाणे: महायुतीच्या शक्ती प्रदर्शनामुळे आज अवघे ठाणे शहर दणाणून गेले. महायुतीकडून कोपरी-पाचपाखाडीतून विद्यमान मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे, ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि मुंब्रा-कळवामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी अर्ज दाखल केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत हजारो समर्थकांच्या साक्षीने कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. कोपरी-पाचपांखाडी विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री श्री.शिंदे हे मागिल २० वर्षे नेतृत्व करत आहेत. पाचव्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रिपाइं नेते रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास आले होते. सकाळी टेंभी नाका येथिल आनंद आश्रम येथे स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन मॉडेला चेक नाका येथिल दत्त मंदिरात दत्तगुरुचे त्यांनी दर्शन घेतले होते. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बौद्ध भन्ते आणि अकरा ब्राह्मण आले होते. महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाजत-गाजत मिरवणुकीने अर्ज भरला. या मिरवणुकीत सर्व समाजाचे लोक सहभागी झाले होते. विशेषतः अल्पसंख्याक समाजातील महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. वागळे येथिल रस्ता क्र.१६ मार्गे किसननगर पडवळनगर श्री नगरमार्गे ही मिरवणूक वागळे सर्कल येथिल आयटीआयमधील निवडणूक कार्यालयात पोहचली. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे आणि नातू यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, राम रेपाळे आदी उपस्थित होते.

केळकर यांची दमदार रॅली

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी आईचे आशिर्वाद घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी त्यांनी घंटाळी देवी मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले.
सोमवारी सकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, माजी नगरसेवक नारायण पवार, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, संदीप लेले, परिवहन सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, सचिन पाटील, महेश कदम, डॉ. राजेश मढवी आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो हितचिंतक, नागरीक उपस्थित होते.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय केळकर यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारालाही सुरुवात केली असून, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार संजय केळकर यांच्याकडून सोमवारी (ता.२८) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. नौपाडा येथील घंटाळी मंदिरात श्री. केळकर यांनी सपत्नीक सहकुटुंब देवीचे दर्शन घेऊन मातोश्रींचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात साग्रसंगीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुक काढण्यात आली. संजय केळकर यांना पाठींबा दर्शविण्यासाठी मातृशक्तीसह प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. यावेळी श्री. केळकर यांचे चौकाचौकात जोरदार स्वागत करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताप्रमाणे विकसित ठाणे साकारण्यासाठी तिसऱ्यांदा ठाणेकरांचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल, असा विश्वास यावेळी आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला यांचा अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय-आठवले गट, आरपीआय-कवाडे गट या महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नजीब मुल्ला यांनी सोमवारी, मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआय (आठवले गट) ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, पीआरपी ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार आदी उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना नजीब मुल्ला यांनी पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. विकास भूखंड अतिक्रमणापासून वाचवून त्याचा विकास करणार, सर्व गोरगरीबांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणार, घोषणा कमी करणार, जास्त कृती करुन लोकांची कामे करणार, १५ वर्षे खोटी आश्वासने, कृती शून्य कारभार करणाऱ्यांनी भाजपची खोटी भिती निर्माण केली आहे. कळव्याची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हायवेला जोडणारा काऊंटर रिंग रुट तयार करणार, विटाव्याच्या पलिकडे नवीन पूल बांधणार, पारसिकच्या मागून नवीन सेवा रस्ता बांधणार आहोत. या मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी आपल्या भावाला, आपल्या मुलाला विजयी करा, असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले आहे.