डेंग्यू, मलेरिया, लेप्टोग्रस्तांसाठी संजीवनी ठरणार एफेरेसिसी यंत्र

* यंत्राद्वारे थेट शरीरातून काढल्या जातात प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लाल पेशी
* सिव्हील रुग्णालयात आवश्यक रक्तघटक सहज उपलब्ध

ठाणे : रक्ताच्या एका पिशवीत रक्ताचे वर्गीकरण केल्यावर मिळणाऱ्या घटकांचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे अनेकदा रक्तातील प्लेटलेट्स, प्लाझ्मा घटक शोधण्यासाठी धावाधाव करावी लागते. अशावेळी आता सिव्हील रुग्णालयात शरीरातून रक्तातील हवा तो घटक काढून घेण्याचे एफेरेसिसी मशीन तैनात ठेवण्यात आले आहे. गरजेनुसार रक्तदात्याकडून केवळ प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लाल पेशी काढल्या जाणार आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरोसिस, गर्भवती महिला आदींसाठी लागणाऱ्या प्लेटलेट्स मिळवण्यासाठी होणारी दमछाक कमी होणार आहे.

डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टो स्पायरोसिससारखा ताप आल्यावर अनेकांचा थरकाप उडतो. अशा तापावर त्वरित उपचार न मिळाल्यास जीवावर बेतू शकते. शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे रक्त गोठण्याची क्रिया क्षीण होऊन जाते. प्लेटलेट्स मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते. खाजगी रक्तपेढीमध्ये प्लेटलेट्ससाठी खर्चही जास्त होतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब बनते. परंतु सिव्हील रुग्णालयात आधुनिक एफेरेसिसी ही मशीन आणली आहे. या मशीनद्वारे रक्तदात्याच्या रक्तातील हवा तो घटक काढता येणे शक्य झाले असल्याची माहिती रक्तपेढी प्रमुख डॉ. गिरीश चौधरी यांनी दिली.

रक्तदान केल्यानंतर शरीरातून साधारण ३५० मिली लीटर रक्त काढले जाते. यामध्ये प्लेटलेट्सची संख्या साधारण पाच हजार इतकी असते. मात्र एफेरेसिसी मशीनमुळे रुग्णासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या मशीनद्वारे रक्तदात्याच्या शरीरातून ५० हजार प्लेटलेट्स काढता येणार असून, प्लेट लेट्सच्या एका पिशवीत रुग्ण बरा होण्यास मदत मिळणार आहे.

रुग्णालयात ही मशीन सुरू करण्यात आली आहे. या मशीनची पाहणी करतेवेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल राहुड, डॉ. गिरीश चौधरी, विनोद जोशी उपस्थित होते.

एकदा रक्त दिले की तीन महिन्यांनी रक्तदान करावे. मात्र एफेरेसिसी मशीनमुळे रक्तातील प्लेटलेट्स आठवड्यातून दोनवेळा देखील देता येऊ शकतील. प्लेटलेट्सप्रमाणे प्लाझ्मा, लाल पेशी आणि शुद्ध रक्त काढण्याची सोय आहे. या मशीनवर एका रक्तदात्याने प्लेटलेट्स काढल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी दिली.