ठाणे : प्रिया सिंग मारहाण प्रकरणात अश्वजीत गायकवाड याच्यासह रोमिल पाटील आणि सागर शेडगे या दोघांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे.
पोलीस तपासकामात सहकार्य करणे तसेच फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर कोणताही दबाव टाकू नये अशी अट जामीन देताना टाकण्यात आली आहे. ठाणे न्यायालयात जमीन मिळाल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे प्रिया सिंग यांचे वकील ॲड. बाबा शेख यांनी सांगितले आहे.
अश्वजीत गायकवाड याने प्रेयसी प्रिया सिंग हिला केलेल्या मारहाण आणि अंगावर गाडी घातल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपी अश्वजीत गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांना रविवारी अटक केली होती, तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ आणि लँड रोव्हर डिफेंडर गाडी देखील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली स्थापन केलेल्या एसआयटीकडून तिघांना अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आली. त्यानंतर गायकवाड यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर अश्वजीत गायकवाड याच्यासह त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे या दोघांना जामीन झाला आहे.
दरम्यान प्रिया सिंग यांचे वकील बाबा शेख यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव होता. ज्यावेळेला प्रिया सिंगचा पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावेळेला प्रिया सिंग पूर्णपणे शुद्धीवर नव्हती. तरी देखील तिचा जवाब नोंदवण्यात आला.
ठाणे पोलिसांनी अश्वजीत आणि त्याच्या साथीदारांवर जामीनपात्र गुन्हे दाखल केल्याने अश्वजीतला जामीन मिळण्याची शक्यता त्यांनी आधीच वर्तवली होती. प्रिया सिंगने पोलिसांकडे ३०७ चा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप ॲड. बाबा शेख यांनी केला आहे. अश्वजीतला जामीन मिळाल्याने प्रिया सिंग च्या वकिलांकडून ३०७ आणि ३७६ चे कलम दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.