पत्रकारितेत राजकारणाशिवाय दुसरे विषयही महत्वाचे-विजय कुवळेकर

ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांना शि.म.परांजपे पुरस्कार प्रदान

मुंबई : राजकारणाशिवाय दुसरे इतर विषयही महत्वाचे आहेत. प्राधान्य कशाला द्यावे याचे भान अपवाद वगळता काही मालक-संपादक आणि पत्रकार विसरत चालले आहेत. अनेक पत्रकारांना भूगोल, इतिहास, समाजशास्त्र इतर विषयाचे आकलन नाही. यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करून देण्याची गरज आहे. असे मत ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी महाराष्ट्र संपादक परिषदेने आयोजित केलेल्या पत्रकारिता गौरव आदर्श साहित्य पत्रकारिता सन्मान पुरस्कार व विशेष पुरस्कार २०२४ सोहळ्यावेळी व्यक्त केले.

शनिवार ४ मे रोजी मुंबईतील दादर- माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा पश्चिम येथे सायंकाळी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार श्री यमाजी मालकर, जेष्ठ संपादक श्री विजय कुवळेकर, ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे आणि जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुसंवादिनी शिबानी जोशी यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर व स्व. यशवंत पाध्ये यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी केले.

यावेळी २०२४ चे पत्रकारिता साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांना शि.म.परांजपे पुरस्कार प्रदान करण्यात आला. झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार, दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकार ज्ञानदा कदम, पुण्यनगरी ठाणेचे निवासी संपादक हेमंत जुवेकर, महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी वैभव वझे, सीएनएन न्यूज १८ च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे (पंडित), मराठवाडा साहित्य संमेलन २०२३ चे माजी अध्यक्ष जगदीश कदम, दै. सकाळचे प्रतिनिधी महेश माळवे, साप्ताहिक लोकवृत्तान्तचे संपादक एकनाथ बिरवटकर यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले.

पत्रकारिता साहित्य गौरव विशेष पुरस्कार जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी, दैनिक नांदेड एकजूटच्या ज्येष्ठ संपादिका अनुराधा विष्णूपुरीकर, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील आनंदराव (दादा) माईंगडे, लोककला शाहीर रुपचंद चव्हाण यांना देण्यात आले.

महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था कोणत्याही संघटनेशी समांतर किंवा स्पर्धात्मक कार्य न करता पत्रकारितेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत राहणारी संस्था आहे. ही संस्था म्हणजे संपादक-मालक प्रामुख्याने दैनिकांचे व त्यांनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी यांची संघटना आहे. ही संस्था ध्येयासक्त, पारदर्शी आणि विश्वासार्ह आदर्श पत्रकारितेसाठी वचनबद्ध असेलेली संस्था आहे. ही संस्था मराठी भाषा, संस्कृती व अस्मितेशी वचनबद्ध असून, या संस्थेने वाचन संस्कृतीचे संवर्धन व ग्रंथालय चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. विविध प्रसार माध्यमांशी अनुबंध निर्माण करून त्यांच्या सहयोगातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकजागृती यांसाठी सहभाग घेणे, पत्रकारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणे, पत्रकारिता आणि साहित्य यांचा अनुबंध राखणे आणि नैसर्गिक आणि आपदग्रस्त पत्रकारांसाठी साहाय्य करणे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे. तसेच या संस्थेतर्फे दरवर्षी आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार योजनेमधून राज्यस्तरीय मानवंत व गुणवंत पत्रकारांचा सन्मान केला जातो. मुंबई आऊटलूक मीडिया हाऊसचे मुख्य संपादक व महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिषदेचे सचिव एकनाथ बिरवटकर, उपाध्यक्ष गजानन चव्हाण, सुधीर जाधव, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

‘काळ’ सुसंगत पत्रकारिता करण्याची जबाबदारी-बल्लाळ

‘काळ’कर्ते शिवरामपंत परांजपे यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. त्या काळातील पत्रकारिता कालबाह्य झाल्याची खंत ज्येष्ठांकडून व्यक्त होत असताना ‘काळ’ सुसंगत पत्रकारिता करण्याचा संकल्प आजच्या पत्रकारांनी करायला हवा’, असे श्री. बल्लाळ सत्कारास उत्तर देताना म्हणाले. ‘ठाणेवैभव’च्या आगामी वर्षात सुवर्ण महोत्सव सुरू होत असताना हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.