एपीएमसीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी शेतमाल फेकून केला निषेध
ठाणे: एकीकडे लोकसभा निवडणुकीत सर्वपक्षीय नेते शेतकरी आणि त्यांच्या समस्या यावर तोंड भरून बोलत असताना दुसरीकडे मात्र शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने तो फेकून दिला जात आहे. याकडे मात्र नेते मंडळी कानाडोळा करत असल्याचे चित्र नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पाहायला मिळत आहे.
वाशी येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक, पुणे, सातारा, सांगली, चंदगड, कऱ्हाड या भागातून दरदिवशी लाखो टन भाजीपाला घेऊन शेतकरी येतात. टॉमॅटो, फळभाज्या, पालेभाज्या तसेच फळांचा यात समावेश असतो. सध्या उन्हाळा असल्याने भाज्या लवकर नासतात. त्यामुळे शेतकरी पहाटे लवकर वाशी मार्केटमध्ये येतात. या मार्केटमधील व्यापारी लवकर माल खरेदी करून भाज्यांना चांगला भाव मिळेल या आशेवर असतात, परंतु निवडणुकीच्या धामधूमीची संधी साधून व्यापारी सकाळपासून आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत ठेवत आहेत, त्यामुळे दुपारी ताज्या भाज्या नाश पावण्यास सुरुवात होते. परिणामी शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजी विकून गावी जावे लागत आहे.
आज काही शेतकऱ्यांनी व्यापारी लवकर टॉमॅटोची खरेदी करत नसल्याचे पाहून ट्रकमध्ये आणलेला संपूर्ण माल रस्त्यावर ओतून व्यापाऱ्यांचा निषेध केला. अशीच परिस्थिती अन्य प्रकारच्या भाज्या आणि फळे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे.
याबाबत माल रस्त्यावर टाकणाऱ्या शेतकऱ्याशी संपर्क साधला असता तो म्हणाला कि आम्ही पहाटे येतो. मार्केट ९ वाजता सुरु होते, परंतु पार दुपार होते तरी व्यापारी मालाची खरेदी करत नाहीत. उन्हाळा कडक आहे. त्यामध्ये माल खराब होण्याची भीती असते. त्याची कल्पना व्यापाऱ्यांना असते. ते हा माल कवडीमोल भावात मागतात. शेतकरी देखिल माल सडून जाण्यापेक्षा जो भाव मिळेल त्या भावात विक्री करतात. त्यामध्ये मेहनतीचा मोबदला देखिल मिळत नसल्याने हा माल फेकून देऊन व्यापाऱ्यांचा निषेध केला असल्याचे सांगितले.
शेतकरी आणि माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. ठाणे लोकसभा मतदार संघात हे मार्केट येते. याच मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे. ते स्वतः शेतकरी आहेत. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.